आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 18 : अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन महसूल वाढीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रभावीपणे प्रयत्नशील राहील. यामुळे देश व राज्याच्या महसुलातही मोठी भर पडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. या गाड्या विभागाचे सक्षमीकरण करण्यासाठी दिलेल्या असून गुन्हा अन्वेषणातील कामगिरी उल्लेखनीय करण्यास आणि महसूल उद्दिष्टाची पूर्तता करण्यास त्यामुळे मदत होईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.
विधानभवन समोरील वाहनतळावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ५९ नवीन वाहनांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फीत कापून व वाहनाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा-नायर सिंह, आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त विश्वनाथ इदिसे, संचालक दक्षता व अंमलबजावणी श्रीमती उषा वर्मा, उपाआयुक्त सुनील चव्हाण, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रधान सचिव वल्सा- नायर सिंह म्हणाल्या की, या नवीन गाड्यांच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजात नक्कीच अधिक गती येईल आणि त्याचा चांगला परिणाम होईल. या विभागात अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सऍप क्रमांकही देण्यात आले आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाईस गती आली आहे. नवीन वाहने विभागातील अधिकाऱ्यांना गुन्हा अन्वेषणातील उल्लेखनीय कामगिरी करण्यास सहाय्यभूत ठरतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या वेळी महिंद्रा अण्ड महिंद्रा, कंपनीचे अधिकारी गुरुप्रिंतसिंग रंधावा, मारोती सुझुकीचे अधिकारी जावेद सय्यद यांनी प्रतिनिधिक स्वरूपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चावी दिली. या नवीन 59 वाहनात महिंद्रा अंड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ मॉडेलच्या 51 स्कॉर्पिओ व मारोती सुझुकी कंपनीच्या इर्टिगा 8 कारचा समावेश आहे. विभागासाठी एकूण 271 वाहने मंजूर करण्यात आली आहेत.