आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ या मासिकाच्या मे-2022 महिन्याच्या ‘देदीप्यमान महाराष्ट्र’ या पर्यटन विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन झाले. पर्यटन विशेष व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी निमित्त कृतज्ञता पर्व विशेष विभाग हे या अंकाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
राज्यात पर्यटनाच्या असंख्य संधी आहेत. कृषी पर्यटन, वन पर्यटन, जलपर्यटन तसेच लेणी, जागतिक वारसास्थळे, धार्मिकस्थळे, गडकिल्ले, जैवविविधता अशा असंख्य पर्यटनाच्या पर्यायांनी महाराष्ट्र समृद्ध आहे. या वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांची माहिती देणारे लेख या अंकात समाविष्ठ आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे केले जात आहे. या अंकात समाविष्ट करण्यात आलेल्या ‘कृतज्ञता पर्व विशेष’ विभागात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची, योगदानाची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर ‘कांदळवन संरक्षण व संवर्धन’, ‘समता सप्ताह’, ‘जागतिक परिचारिका दिन’ आदी विषयांचे लेख यात आहेत. मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी या नेहमीच्या सदरांबरोबर लक्षवेधी पुस्तकांचा परिचय करून देणारे ‘वाचू आंनदे’ हे नवीन सदर या अंकापासून सुरु करण्यात आले आहे. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.