मिरजोळेतील प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकूल उभारणीच्या कामास गती द्या- ॲड. अनिल परब

आठवडा विशेष टीम―

रत्नागिरी दि. 19 : शहरालगत मिरजोळे येथील प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकूल उभारणीच्या कामास गती मिळण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर तांत्रिक बाबी पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत याबाबतचा आढावा पालकमंत्री ॲङ परब यांनी घेतला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ऑनलाईन पध्दतीने बैठकीत सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, उपवन संरक्षक प्रियंका लगड आदिंची उपस्थिती होती.

जिल्हा क्रीडा संकूलात खेळाची मैदाने 400 मीटर ट्रॅक तसेच फुटबॉल मैदान आदिंचे नियोजन आहे. याचे अंदाजपत्रक 18 कोटी 80 लाख रुपये इतके आहे. जिल्हा क्रिडा संकूलासाठी मंजूर 15 कोटी निधीपैकी 3.45 कोटी रुपये प्राप्त झाले असून तालुका क्रीडा संकूलासाठी मंजूर 5 कोटी पैकी 1 कोटी रुपये प्राप्त आहेत.

जिल्हयात खेळाडूंची संख्या अधिक आहे. त्यामुळे तालुका क्रिडा समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्राप्त 1 कोटीचा निधी जिल्हा संकुल निधीस वर्ग केला आहे. या एकूण 4 कोटी 45 लाख रुपयातून या कामास सुरुवात करा लागेल तसा निधी उपलब्ध करुन देवू असे पालकमंत्री ॲङ परब यांनी सांगितले. या निधीतून काम सुरु करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मारुती मंदीर येथील सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलास कबड्डी मॅटस खरेदी करण्यात आल्या आहेत तसेच 15 लाख रुपये खर्चून बास्केटबॉल कोर्टचे काम होणार आहे.या शहराच्या महत्वाच्या ठिकाणी असलेल्या संकुलाच्या रंगकामास आजच्या बैठकीस मान्यता देण्यात आली.

मालगुंड येथील प्राणीसंग्रहालय

मालगुंड येथील प्रस्तावित प्राणी संग्रहालयाच्या कामाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. 15.49 हेक्टर क्षेत्रात हे लघु प्राणीसंग्रहालय प्रस्तावित आहे. यासाठी 63 कोटी 11 लाख रुपये निधी लागणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतील हे संग्रहालय गणपतीपुळे पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. गणपतीपुळे येथे वर्षाकाठी 20 लाख पर्यटक भेट देतात. त्यासर्वांसाठी या निमित्त आणखी एक आकर्षण स्थळ निर्माण होईल.
याबाबतचा प्रस्ताव नागपूर येथील मुख्यवन सरंक्षक यांच्या कार्यालयास पाठविण्यात आला आहे. याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना पालकमंत्री ॲङ परब यांनी दिल्या.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.