प्रशासकीयब्रेकिंग न्युज

९० कोटींच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एकास अटक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि 19 : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची महसुली हानी करणाऱ्या करदात्यांविरोधात शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत  मे.एस.एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करून सुमारे 90 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार शशांक वैदय यांना अटक करण्यात आली असल्याचे वस्तू व सेवा कर विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

शशांक वैदय यांनी मे.एस.एस. सर्व्हिसेससह अन्य पाच बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे 88 कोटी रूपयांची खोटी बीजके जारी केली आहेत. त्यानुसार शासनाची सुमारे 16 कोटींची महसुली हानी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना शशांक वैदय हे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांचा पूरवठा न करता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन केले गेले आहे. त्यामुळे शशांक वैदय या व्यक्तीस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी साठी दिनांक १८ मे २०२२ रोजी अटक केली आहे. या व्यक्तीचे कृत्य हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवाकर कायदा २०१७ नुसार तुरूंगवासास पात्र आहे. या व्यक्तीस अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दि. ३१ मे २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांच्या पुरवठ्याशिवाय 17 कोटी रूपयांची बनावट बीजके देऊन, 3.09 कोटी रूपयांचा वस्तू व सेवा कर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरित करून 3.09 कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. तसेच करदाता मे.एस.एस. सर्व्हिसेसच्या मालक सायली परूळेकर या कोणताही व्यवसाय करीत नाहीत, असे तपासात लक्षात आले आहे.

या प्रकरणात अन्वेषण अधिकारी लीनता चव्हाण, सहाय्यक राज्यकर आयुक्त या प्रविण कुलकर्णी, राज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. सदर तपासासाठी अनिल भंडारी (भा.प्र.से), सहआयुक्त, अन्वेषण-क यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. लीनता चव्हाण या महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागात अटक कार्यवाही करणा-या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सदर कार्यवाहीसाठी रंजित हातोले, सुमेधकुमार गायकवाड आणि श्रीकांत पवार सर्व सहाय्यक राज्यकर आयुक्त आणि इतर राज्यकर निरीक्षक यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. या आर्थिक वर्षातील सलग दहाव्या अटक कार्यवाहीतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button