स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनांचा तांदूळ आणि आंबा महोत्सव

आठवडा विशेष टीम―

नवी मुंबई, 19 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान – उमेदच्या राज्यभरातील स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनावर आधारित तांदूळ आणि आंबा महोत्सव दिनांक 20 ते 22 मे 2022 या कालावधीत पुणे विद्यार्थी गृहचे विद्याभवन, नेरूळ, नवी मुंबई येथे आयोजित केला आहे.

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या शेतातील तांदुळाच्या विविध जाती, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला हापूस, केशर, पायरी इत्यादी प्रकारचा आंबा या महोत्सवात उपलब्ध असेल. या महोत्सवामध्ये इंद्रायणी हातसडीचा, इंद्रायणी पॉलिश, दप्तरी, जय श्रीराम, सेंद्रिय ब्लॅक, वाईसार, खुशबू, चिमण साळ, भवाळ्या जिरेसाल या प्रकारच्या जातींचा तांदूळ या महोत्सवामध्ये प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचसोबत अवळाची उत्पादने, विविध प्रकारचे पापड, विविध मसाले, रोस्टेड गहू, नाचणीचे खाद्य पदार्थ, बांबू पासून तयार केलेल्या कलाकृती यासारख्या अनेक गोष्टी या महोत्सवात प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

या महोत्सवाचे उद्घाटन अभियानाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कोकण विभागीय उपसंचालक गणेश मुळे, पुणे विद्यार्थी गृहचे संचालक दिनेश मिसाळ, स्माइल फाउंडेशनच्या उमा धीरज आहुजा इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिनांक 20 मे 2022 रोजी सकाळी 12 वाजता होणार आहे.

नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थिती देऊन दर्जेदार व शुद्ध उत्पादने खरेदी करून ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाला हातभार लावण्याचे आवाहन अभियानाच्या उपसंचालक शीतल कदम यांनी केले आहे.

000

संजय ओरके/विसंअ/

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.