जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून विकासाची कामे वेळेत पूर्ण करावीत- उपमुख्यमंत्री अजित पवार

आठवडा विशेष टीम―

पालघर दि 20 : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळा तसेच शासकीय आश्रमशाळांचा दर्जा वाढविण्याबरोबरच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत ५ टक्के निधी शिक्षणासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. सदर निधी शिक्षणासाठीच खर्च करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकारी वर्गांना दिले.

 

डहाणू येथील अदाणी पावर येथे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदही वाढाण,खासदार राजेंद्र गावित सर्वश्री आमदार सुनील भुसारा, विनोद निकोले श्रीनिवास वंनगा जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, सहाय्यक जिल्हाधिकारी आयुशी सिंह, अशिमा मित्तल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये विकास कामे करत असताना सर्व शासकीय यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवणे आवश्यक आहे. यामुळे जिल्ह्यातील विकास कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्याला वैभवशाली संस्कृती लाभली असून विकास कामे करताना संस्कृती,परंपरा यांना धक्का न लागताविकास कामे वेळेत पूर्ण करावे. विकासकामे नागरिकांच्या सुविधेकरिता असल्यामुळे विकास कामे करताना स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊनच करावीत. शासकीय जागेवर विकास काम सुरू असताना विनाकारण जर कोणी अडथळा निर्माण करत असेल तर अशा मनोवृत्ती विरुद्ध योग्य ती कारवाई करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

कुपोषण जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी आदिवासी भागात जनजागृती करून आदिवासी बांधवांना रोजगार किंवा नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी वित्तीय संस्थांनी अर्थ साहाय्य करणे गरजेचे आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

दि डहाणू रोड जनता को-ऑपरेटिव बँकेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार राजेंद्र गावित सर्वश्री आमदार सुनील भुसारा, विनोद निकोले, श्रीनिवास वनगा, दि डहाणू रोड जनता को-ऑपरेटिव बँकेचे अध्यक्ष मिहीर शहा, उपाध्यक्ष भावेश देसाई तसेच बँकेचे संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.