महानगरांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकू असा विश्वास आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

आठवडा विशेष टीम―

ठाणे, दि. २० (जिमाका): आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन महानगरांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकू असा विश्वास त्यांच्यात निर्माण करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शहापूर तालुक्यातील कोठारे येथील आश्रमशाळेच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शहापूर तालुक्यातील कोठारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन आणि शहापूर तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख आमदार दौलत दरोडा, वि.जा. व भ.ज. कल्याण समिती प्रमुख आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील, प्रकल्पस्तरीय आढावा समिती अध्यक्ष आशा मोरे, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहब दांगडे, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त महेंद्र वारभुवन, ठाण्याच्या अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शिक्षण हा आदिवासी बांधवांचा मूलभूत अधिकार

यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, आश्रमशाळांच्या केवळ चांगल्या इमारती उभ्या न करता तेथे आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देवून त्यांचे भविष्य घडले पाहिजे. आश्रमशाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांची पारदर्शकपणे भरती केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे आधुनिक शिक्षण देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान,तंत्रज्ञान विषयाशी मैत्री करून जागतिक घडामोडीदेखील समजून घेतल्या पाहिजे. शिक्षण हा आदिवासी बांधवांचा मूलभूत अधिकार असून तो मिळवून देण्याची आमची जबाबदारी असल्याची भावना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

शहापूरच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही

आदिवासी भागात कुपोषणाची समस्या कमी करण्याकरीता सकस आहारावर भर दिला पाहिजे. या भागातील मुला-मुलींना हा सकस आहार मिळवून देण्यासाठी पाऊले उचलण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शहापूर तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असून यासंदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रालयात आदिवासी विकास, जलसंपदा, गृहनिर्माण आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक घेवून पाणी प्रश्न आणि आदिवासी बांधवांना घरे देण्याबाबत मार्ग काढला जाईल. या भागाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रस्तावित योजनेला मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शहापूरच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आदिवासी भागात नर्सरी शिक्षण सुरू करण्याचा प्रयत्न- आदिवासी विकास मंत्री ॲड. पाडवी

आदिवासी विकासमंत्री ॲड पाडवी म्हणाले की, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरीता आदिवासी भागासाठी शिक्षण धोरण नव्याने करण्याची गरज असून त्यामध्ये लहानपणापासून मुलांना इंग्रजीचे ज्ञान देण्यासाठी भर द्यायची आवश्यकता आहे. या वर्षापासून आदिवासी भागात नर्सरी शिक्षण सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी येथे सांगितले. आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावतानाच आदिवासी भागातील मुलंमुली भारतीय प्रशासन सेवेत येण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आदिवासी विभागामार्फत विटभट्टी मजुरांना सक्षम करण्यासाठी योजना काढत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून मिळणारा निधी वाढवून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. शहापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधी दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन मिळावे- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले की, आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन मिळाले पाहिजे. जेणेकरून त्यांच्यातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आपले भविष्य करू शकेल. शहापूर तालुक्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार श्री.दरोडा यांनी मनोगत व्यक्त केले. शहापूर तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची त्यांनी माहिती दिली. कोठारे उपसा जलसिंचन योजनेसाठी निधी देण्याची मागणी यावेळी केली. आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव यांनी यावेळी प्रास्ताविक केले.

यावेळी विविध विभागांच्या माध्यमातून योजनांविषयी माहिती देणाऱ्या स्टॉलची पाहणी उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी केली. यावेळी उमुख्यमंत्री यांच्या हस्ते मोबाईल व्हेजिटेबल व्हॅन वितरण, गुणवंत विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बचत गट आणि वीटभट्टी व्यवसाय लाभार्थ्‍यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना तुला भविष्यात काय व्हायचं आहे अशी विचारणा उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला केली.

ढोल, लेझिम पथक आणि पारंपरिक आदिवासी नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी आभार मानले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.