औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला कोल्ड स्टोरेजसाठी निधी देऊ- फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे

आठवडा विशेष टीम―

      औरंगाबाद दि. 20 (आठवडा विशेष) – औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय संचालक मंडळ अतिशय चांगले कामकाज करीत आहे. पाचोड येथील कोल्ड स्टोरेजच्या धर्तीवर औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी येत्या वर्षात निधी मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांनी दिली.

      उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती, औरंगाबाद व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या आग्रहास्तव उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत 20 ते 23 मे 2022 या कालावधीत मुख्य बाजार आवार, जाधववाडी, औरंगाबाद येथे आयोजित आंबा महोत्सावाचे उद्घाटन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भूमरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार अंबादास दानवे, कल्याण काळे, कैलास पाटील, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी.एस.मोटे, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे, मुरलीधर चौधरी, शिवाजी गावंडे, कृष्णा उकिर्डे, शिवाजी ढाकणे, शेख मोहंमद शेख चाँद, प्रकाश जाधव, गणेश नवले, अशोक शिंदे, मो. अबु सुफियान मो. गयास बागवान व कृषी पणन मंडळ, औरंगाबाद उपसरव्यवस्थापक जी.सी. वाघ तसेच बाजार समितीचे सचिव व्ही. ए. शिरसाठ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

      मंत्री भूमरे यांनी शेतकऱ्यांनी लावलेल्या स्टॉलला भेट दिली. प्रथम बाजार समितीचे प्रशासक कै. उदयराज पवार यांचे पंधरा दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तद्नंतर बाजार समितीचे मुख्य प्रशासक यांच्यावतीने आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

      जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बाजार समितीने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाची स्तुती केली. समितीचे धर्तीवर कोकणामधील हापूस व मराठवाड्यातील केसर आंबा शहरातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरात प्रचार-प्रसिद्धी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केल्या जाईल, असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फळबागेविषयी सविस्तर मागदर्शन केले.

      बाजार समितीचे मुख्य प्रशासक काळे यांनी प्रास्ताविक केले. बाजार समितीने उपबाजार आवारासाठी करोडी येथे 20 एकर जमीन संपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेला आहे. त्यामुध्ये जिल्हाधिकारी यांनी सहाकार्य करावे, अशी मागणी श्री.काळे यांनी केली. आभार बाजार समितीचे अशोक शिंदे यांनी मानले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.