आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 20 : अनाथ बालकांना दत्तक घेणाऱ्या पालकांची संख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहे. महिला व बालविकास विभागाने प्रतिपालकत्व पोर्टल तयार केले आहे. आजपर्यंत या पोर्टलवर दहापेक्षा अधिक पालकांनी नोंदणी केली असून याबाबत विभागामार्फत पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रतिपालकत्वासाठी इच्छुक असणारे अनेक पालक जिल्हास्तरावर माहिती घेत आहेत. या पोर्टलला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, ही आनंददायी बाब आहे. प्रतिपालकत्व नोंदणीसाठी या पोर्टलवर जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
अनाथ लेकरांना कुटुंबाची, आपल्या माणसांच्या प्रेमाची गरज असते. त्यामुळे अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देऊ शकणारी प्रतिपालकत्व योजना क्रांतिकारी ठरणार आहे. अनाथ बालकांना कुटुंब मिळवून देण्याच्या कामाइतके मोठे पुण्य नाही, असे मत मंत्री ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
महिला व बाल विकास विभागाने अतिशय सुरक्षित आणि पारदर्शी असे Foster Care Registration Portal विकसित केले आहे. हे निश्चितच एक महत्त्वाचे पाऊल असून त्यामुळे काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना त्यांचे हक्काचे क्षण, प्रेम, काळजी, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी मदत होईल. इच्छुक पालक या पोर्टलवर प्रतिपालक म्हणून नोंदणी करू शकतात. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना आपुलकीने कुटुंबात समाविष्ट करून त्यांना प्रेमळ वातावरणात वाढण्याची संधी द्या आणि https://fc.wcdcommpune.com या संकेतस्थळाला भेट देऊन प्रतिपालक म्हणून नोंदणी करावी,असे आवाहन मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले आहे.
प्रतिपालकत्व नोंदणी पोर्टल हे अर्ज भरण्यासाठी सुरक्षित व सुलभ आहे. “अर्जदार आणि विभाग यांच्या मधील दुहेरी प्रणालीच्या माध्यमातून सुलभ व जलद अर्जाची प्रक्रिया, शासकीय कार्यालयांना कमीत कमी भेटी, ऑनलाईन अर्जाची स्थिती, ऑनलाईन शंकानिरसन यंत्रणा, कालबद्ध निपटारा स्वयंचलित संदेश आणि ई-मेल यामार्फत अर्जाची स्थिती कळविण्यात येत आहे.