आठवडा विशेष टीम―
बुलडाणा, (आठवडा विशेष) दि. 21 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंदखेडराजा येथील विविध ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. तसेच राजे लखोजीराव जाधव राजवाडा येथील माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार किरण सरनाईक, नगराध्यक्ष सतिष तायडे, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव, ॲड. नाझेर काझी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राजवाडा येथे पुरातत्व विभागातर्फे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. राज्य पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वहाने यांनी याठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. शिवाजी राजे जाधव यांनी यावेळी लखोजी राजे जाधव यांनी प्रतिमा भेट दिली.
सुरूवातीला जिजाऊ सृष्टीला भेट देऊन माँ जिजाऊ यांना अभिवादन केले. त्यानंतर मोती तलाव, काळा कोट येथील संग्रहालय व परिसर, सावकारवाडा, रंग महाल, निळकंठेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, राजे लखोजी जाधव यांच समाधी, पुतळा बारव या ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. भेटी दरम्यान सुरू असलेली संवर्धन व संरक्षणाची कामांची पाहणी करीत श्री. पवार यांनी दर्जेदार व पर्यटन वाढीस अनुकूल असणारी कामे करण्याच्या सूचना दिल्या. रंगमहालची पाहणी करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी वापरण्यात येणारे साहित्याची तपासणी केली. तसेच येथील कामगारांची विचारपूस केली. जिजाऊ सृष्टी हेलिपॅडवर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे स्वागत करण्यात आले. दौऱ्यादरम्यान राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी भूषण अहीरे, तहसीलदार सुनील सावंत आदी उपस्थित होते.