अंकलखोप येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्यवस्थापनाबाबत तातडीने समिती स्थापन करा

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 24 : सांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे हस्तांतरण ग्रामपंचायतीला करण्याबरोबरच स्मारकाच्या दैनंदिन व्यवस्थापनाबाबत समिती स्थापन करण्याची सूचना सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आज केली. त्यासोबतच ६ डिसेंबरपूर्वी या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा, असे  निर्देशही त्यांनी दिले.

अंकलखोप येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्यवस्थापनाबाबत सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, अंकलखोपचे सरपंच अनिल शिवलिंग विभुते आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते, तर दूरदृश्य प्रणालीवर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेल्या अंकलखोप येथील स्मारकाची देखभाल होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीला हे स्मारक हस्तांतरित करण्यापूर्वी त्या स्मारकाच्या दैनंदिन व्यवस्थापनाच्या खर्चाबाबत तरतूद आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव करून शासनास पाठवावा, त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. कदम यांनी सांगितले. तसेच तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याची कार्यवाही ६ डिसेंबरपूर्वी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

अंकलखोप येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात आले असून १४ एप्रिलला तेथे अनुयायांची मोठी गर्दी होते. या स्मारकाची देखभाल आणि दुरूस्ती आवश्यक असून त्यासाठी राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या पुढाकाराने व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे.

0000

प्रवीण कुलकर्णी/उपसंपादक/

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.