पालघर जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत लोकोपयोगी कामांना प्राधान्य

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 24 : पालघर जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत रस्ते विकासाची कामे निवडताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या लोकोपयोगी कामांना प्राधान्य देऊन यादी तयार करण्याचे निर्देश कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

यासंदर्भात श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पालघर जिल्ह्यातील रस्ते विकासाबाबत जिल्हा निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार श्रीनिवास वनगा, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कोकण विभागाचे अधीक्षक अभियंता जे.आर. विभुते, कार्यकारी अभियंता के.डी. घाडगे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.भुसे यांनी प्रारंभी पालघर जिल्ह्यातील तालुकानिहाय रस्ते विकासाच्या उद्दिष्टांची माहिती घेतली. सन 2022-23 या वर्षामध्ये जिल्ह्यात 176 किलोमीटरसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व इतर सर्व कामे मुदतीत व गुणवत्तापूर्वक व्हावीत तसेच कामांचा दर्जा चांगला असला पाहिजे, याकडेही लक्ष द्यावे, असे निर्देश श्री.भुसे यांनी यावेळी दिले.

००००

पवन राठोड/उपसंपादक/24.5.2022

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.