वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या दंड वसुलीच्या तक्रारींची गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली दखल

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि.२५ : राज्यात हेल्मेट सक्ती व विविध कारणांकरिता वाहतूक पोलिसांकडून दंड वसुली केल्या जात असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होत आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेणार असल्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी राज्यात वाहतूक पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने दंड वसुली झाल्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुषंगाने आज मंत्रालयात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गृह राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, कोरोना कालावधीत संचारबंदी असताना बाहेर फिरण्याऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यामागे लोकांचा जीव वाचावा असा उद्देश शासनाचा होता. मात्र या काळात वाहतूक पोलिसांकडून दंड वसुली झाल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने लवकरच राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्रांना शासन निर्णयानुसार कालबद्धरित्या उत्तर देणे बंधनकारक आहे. त्यानुसार एखाद्या प्रकरणाविषयी ज्यादा कालावधी लागत असल्यास कमीतकमी दोन महिन्यात कार्यवाहीचा अहवाल संबंधित लोकप्रतिनिधींना उपलब्ध करुन देण्याचे निर्देश राज्यमंत्री श्री.देसाई यांनी दिले.

००००

पवन राठोड/उपसंपादक/25.5.22

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.