आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 25 : ज्या शेतकऱ्यांना पुराच्या काळात अधिकची वीज देयकं आली त्या वीज देयकांमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशा सूचना जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिल्या.
कृष्णा नदीला गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांचे वीज पंप पाण्याखाली गेले होते. या कालावधीत शेतकऱ्यांमार्फत वीज पंपांचा वापर झाला नाही तरीही शेतकऱ्यांना अधिकचे वीज देयके आकारण्यात आली. यावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे कार्यकारी संचालक योगेश गडकरी, मुख्य अभियंता संजय पाटील आदी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, कृष्णा नदीच्या पुरामुळे वीज पंप पाण्याखाली गेले होते. पाण्याखाली गेलेले मीटर आणि ग्राहक निश्चित करुन त्यांना या कालावधीतील सुधारीत देयके द्यावीत व याबाबत एका आठवड्यात कार्यवाही करावी. तसेच शिराळा, वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यातील नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांनाही सुधारित देयके द्यावीत.
किल्ले येडेमच्छिंद्र परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा होतो. त्यावर उपाययोजना कराव्यात. त्याबाबतचा प्रस्ताव महावितरणने पाठवावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. पूर येणाऱ्या भागातील वीज पुरवठ्याच्या पायाभूत सुविधा सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.
बैठकीस सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.