सफाई कामगारांच्या मागण्या व समस्यांबाबत मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेणार

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 25 : सफाई कामगारांच्या मागण्या व समस्यांबाबत संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व महानगरपालिका आयुक्त, सहआयुक्त यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे संयुक्त बैठक आयोजित करुन निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी सांगितले.

सफाई कामगारांच्या मागण्या व समस्यांबाबत मंत्रालयात राज्यमंत्री डॉ.कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव राजेंद्र सवणे, अवर सचिव अश्विनी यमगर, कार्यासन अधिकारी अजय पवार, भारतीय वाल्मिकी समाजाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश दलोड, सरचिटणीस सुरेश मारु, सदस्य राजीव रजोरा आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ.कदम म्हणाले, राज्य शासनाने सफाई कामगारांसाठी लाड-पागे समिती गठित केली असून सामाजिक न्याय विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी महानगरपालिका स्तरावर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. वाल्मिकी, मेघवाळ, मेहतर समाज व सफाई कामगारांना योग्य न्याय देण्यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त, सहआयुक्त यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करुन महानगरपालिकेत काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन डॉ.कदम यांनी यावेळी दिले. सफाई कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांबाबतचे निवेदन यावेळी राज्यमंत्री डॉ.कदम यांना देण्यात आले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.