प्रशासकीयब्रेकिंग न्युज

जांबुटके येथे साकारणार पहिले औद्योगिक क्लस्टर आदिवासींच्या कलागुणांना मिळणार व्यापक बाजारपेठ

आठवडा विशेष टीम―

नाशिक, दि.25 मे,2022 (आठवडा विशेष वृत्तसेवा): आदिवासी बांधवांच्या कलागुण व कौशल्याला वाव देण्यासाठी पहिले आदिवासी  औद्योगिक क्लस्टर जांबुटके  साकारणार असून या माध्यमातून मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. आज गोल्फ क्लब येथील इदगाह मैदानावर आयोजित आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित आदि महोत्सव उद्घाटन प्रसंगी कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयुक्त (भा.प्र.से) डॉ. राजेंद्र भारूड, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, अपर आदिवासी आयुक्त संदिप गोलाईत, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय कळवण नाशिक विकास मिना, डॉ. साहेबराव झिरवाळ, हिरामण झिरवाळ, मोहन गावंडे आदी उपस्थित होते.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष म्हणाले की, आदिवासी बांधवांमध्ये कला व कौशल्य उपजतच असून जांबुटके येथे साकारण्यात येणाऱ्या औद्योगिक क्लस्टरच्या माध्यमातून हे स्वप्न साकार होणार आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या आदिवासी

उद्योजकांना आपल्या कलावस्तू विक्रीसाठी संधी असणार आहे. त्यांना या ठिकाणी उद्योगासाठी लागणारे भांडवल, जागा, वीज व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या ठिकाणी नाशिकसोबतच महाराष्ट्रातील इतर आदिवासी जिल्ह्यातील तरूण उद्योजकांना सुध्दा रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ पुढे म्हणाले, 27 मे 31 मे 2022 या पाच दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या या आदि महोत्सवास सर्वांनी भेट द्यावी. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आदिवासी तरूण बांधवानी मनातील न्युनगंड दूर करून  व्यवसायाभिमुख व्हावे हाच प्रयत्न आहे. या ठिकाणी विक्री करतांना आदिवासी तरूणांनी बोलते होत पुढे आले पाहिजे. आदिवासी बांधवांनी पिकविलेला सेंद्रीय भाजीपाल्यास कोरोना काळातही विशेष मागणी झाली आहे. श्री. नरहरी झिरवाळ यांनी आज या ठिकाणी उभारलेल्या 36 स्टॉलला भेट दिली व स्टॉलधारकांशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व मान्यवरांच्या हस्ते आदि संस्कृती या कॉफीटेबल बुकचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयुक्त (भा.प्र.से) डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले.

आदिवासींच्या संस्कृतीचे जतन व विकास समान पातळीवर होण्यासाठी सदैव प्रयत्नशील  :डॉ. राजेंद्र भारूड

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयुक्त (भा.प्र.से) डॉ. राजेंद्र भारूड, यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, कोविड निर्बंध खुले झाल्यानंतर प्रथम पुणे शहरा सोबतच  प्रकल्प स्तरावर जव्हार भामरागड,पांडरकवडा येथे प्रकल्प स्तरावर अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले आहे. राज्यात आदिवासी 9 ते 10 टक्के आदिवासी आहेत. त्यांच्या संस्कृतीचे जतन व विकास हा समांतर व्हावा यादृष्टीने

सदैव प्रयत्नशील असून, त्यासाठी अशा प्रकराच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पाच दिवसीय आयोजित महोत्सवात येथे उभारण्यात आलेल्या स्टॉलधारकांना 60 टक्के निधी डि बी टी च्या माध्यमातून दिला जातो यासोबतच त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था व प्रवासभत्ता सुद्धा दिला जातो. या प्रदर्शनात  आदिवासी हस्तकलांचे भव्य प्रदर्शन व विक्री, आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धां व आदिवासी लघुपट महोत्सव यांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धकांना रोख रक्कम व पारितोषिक यांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली आहे.

आदि महोत्सवास नाशिककरांसह आदिवासी बांधवांनी भेट द्यावी  : हिरालाल सोनवणे

यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त करतांना सांगितले की, या ठिकाणी पाच दिवसीय आयोजित  आदि महोत्सवास नाशिककरांसह आदिवासी बांधवांनी आवर्जून भेट द्यावी. येथे उभारण्यात आलेल्या 36 स्टॉलच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीतून पिकविलेले धान्य, वनऔषधी, काष्टऔषधी, शोभेच्या वस्तू, लाकडी खेळणी, वारली चित्रकला व त्यातून साकारलेली वस्त्रे, आदिवासी खाद्य  संस्कृती  हे सर्वच एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहसंचालक आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे हंसध्वज सोनवणे यांनी केले. यावेळी जुन्नर पुणे, चंद्रपूर  गडचिरोली, जव्हार येथील नृत्य पथक कलाकारांनी आपली पारंपारिक नृत्ये यावेळी सादर केली. विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनाही या नृत्यावर थिरकण्याचा मोह आवरता आला नाही.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button