जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य सेवा बळकट असणे अत्यंत आवश्यक – पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर

आठवडा विशेष टीम―

डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत

श्वसनरोग अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन 

अमरावती, दि. 28 : जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य सेवा बळकट असणे अत्यंत आवश्यक आहे. याच धर्तीवर डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकिय महाविद्यालयातील अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्षामुळे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना अमरावती शहरातच या आरोग्य सुविधेच्या लाभ घेता येईल. यामुळे रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना निश्चितच दिलासा मिळेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर यांनी आज व्यक्त केला. 

डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकिय महाविद्यालयात अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन श्रीमती ॲड. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल देशमुख, संचालक डॉ. पद्माकर सोमवंशी, संस्थेचे उपाध्यक्ष नरेश ठाकरे, रामचंद्र शेळके, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकिय महाविद्यालयामार्फत जनसामान्यांच्या आरोग्य सुविधेसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. असे सांगून श्रीमती ठाकूर म्हणाला की,  अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्ष हा येथील सातवा अतिदक्षता कक्ष आहे. यापूर्वी विविध अतिदक्षता कक्ष स्थापन करण्यात आले आहे.  याचा फायदा जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना होतो. शिवाय इतर जिल्ह्यातील रुग्णही येथे मोठया प्रमाणावर उपचारासाठी येतात. कोरोना काळामुळे आरोग्य व्यवस्था बळकट असण्याचे महत्त्व सर्वांना कळले आहे. शासनातर्फे अशा आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

अध्यक्ष श्री. देशमुख यांनी ह्दयाच्या शस्त्रकियेसाठी ऑपरेशन थिएटर बांधण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगितले. सध्याचा धकाधकीच्या काळात ह्दय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी अशा ऑपरेशन थिएटर्सची गरज आहे. यासाठी प्रशासनामार्फत सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रास्तविकेत प्राचार्य डॉ. देशमुख यांनी महाविद्यालयातील आरोग्यविषयक सुविधांची माहिती दिली. अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्षामध्ये आठ खाटांची सुविधा आहे. कोविड काळात संस्थेमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. खाजगी संस्थेमार्फत कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पुढाकार घेणारे हे पहिले रुग्णालय होते. प्रशासनाच्या सहकार्यामुळे येथे ऑक्सीजन प्लांटची निर्मिती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

000000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.