प्राथमिक आरोग्य केंद्रामधून रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा द्या – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

आठवडा विशेष टीम―

चंद्रपूर, दि. 29 मे : माणुसकीचा खरा धर्म हा सेवा आहे. रुग्णालयात आलेला रुग्ण डॉक्टरांना देव मानतो. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णाला आपुलकीने आणि प्रेमाने वागणूक दिल्यास त्याची अर्धी बिमारी तेथेच नष्ट होते. वेदना घेऊन आलेल्या रुग्णावर सौजन्याची फुंकर मारून रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी केले.

जिबगाव (ता. सावली) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी मंचावर नगराध्यक्षा लता लाकड़े, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, सरपंच पुरुषोत्तम चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समीर थेरे, नितीन गोहने, दिनेश चीटनूरवार, विजय कोरेवार, डॉ. देवगडे आदी उपस्थित होते.

या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अतिशय सुंदर बांधली आहे, असे सांगून पालकमंत्री वड़ेट्टीवार म्हणाले, जिबगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे लवकर उद्घाटन व्हावे, अशी नागरीकांची इच्छा होती. यापूर्वी येथील बांधकामाची पाहणी केली असता सोयीसुविधांची कमतरता जाणवली. त्यामुळे 80 लाखांचा अतिरिक्त निधी या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तातडीने मंजूर केला. या इमारतीमधून गरिबांची सेवा व्हावी, हा मुख्य उद्देश आहे. येथे उपस्थ‍ित डॉक्टर आणि नर्स यांनी उपचारासाठी आलेल्या रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा द्यावी. 3 कोटी 50 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राला अतिरिक्त 80 लक्ष रुपये दिले आहे. यातून स्ट्रीट लाईट, परिसराचे सौंदर्यीकरण आदी कामे त्वरित केली जातील. हे प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या लोंढरी  अंतर्गत येत असले तरी पुढील 10 ते 15 दिवसात जिबगाव प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ते नावारूपास येईल. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करावी.

दोन-तीन वर्ष कोरोनाच्या संकटात गेली. यात अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला. अनेक कुटुंबांनी आप्तस्वकीय गमावले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी व आरोग्याच्या दृष्टीने पूर्ण बाबींची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध आहे. जिल्ह्यात सध्या आठ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण होत आहे. अल्पावधीतच ही आरोग्य केंद्रे लोकांसाठी कार्यान्वित केली जाईल. सध्या राज्यात सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला चंद्रपूर हा जिल्हा क्रमांक एकवर आहे.  जिल्ह्यात 115 रुग्णवाहिका धावत असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात जनरेटरसाठी त्वरित प्रस्ताव द्यावा. नियोजन समिती, खनिज विकास निधी किंवा स्थानिक आमदार निधीतून जनरेटरसाठी व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले, सामाजिक सभागृहासाठी 30 लक्ष रुपये मंजूर झाले आहे. नवीन ग्रामपंचायत इमारतीकरिता 30 लक्ष रुपये, सिमेंट रस्त्यासाठी 10 लक्ष रुपये, जिबगाव येथे मागासवर्गीय दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 10 लक्ष रुपये तर सावली तालुक्यात कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीसाठी 41 लक्ष रुपये मंजूर झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. यात लसीकरण कक्ष, ड्रेसिंग रूम, समुपदेशन कक्ष, पुरुष वार्ड, महिला वार्ड, शस्त्रक्रिया विभाग, डिलिव्हरी रूम, औषधी विभाग आदींचा समावेश आहे.

प्रास्ताविकेतून डॉ. गहलोत म्हणाले की, जिबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम 2016 मध्ये सुरु झाले. सद्यस्थितीत सावली तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. जिबगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत 11 गावे असून 17 हजार 685 लोकसंख्येला या माध्यमातून आरोग्य सेवा मिळणार आहे.

कार्यक्रमाचे संचालन सुरेश ठिकरे यांनी तर आभार तालुका वैद्यकीय अधिकारी समीर ढेरे यांनी मानले. कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.