आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सज्ज ठेवा – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

आठवडा विशेष टीम―

सातारा दि. 30 :  जिल्ह्यातील डोंगरी भागात जास्त पाऊस होतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने त्यांचे तात्पुरते स्थलांतर शाळांमध्ये करा. याबरोबरच सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

शासकीय विश्रागृहात आयोजित जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आढावा  बैठकीत ते बोलत होते.  बैठकीला आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, जिल्हा चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, आपत्ती हाताळण्यासाठी पोलीस विभागाने जास्तीत जास्त होमगार्डची मागणी करावी. अतिवृष्टीमुळे रस्ते वाहून गेल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत होते. यादृष्टीने  सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी. आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन घ्यावा. अतिवृष्टीने विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास तो सुरळीत करण्यासाठी महावितरणने आपली पथके प्रत्येक तालुक्यात सज्ज ठेवावीत, अशाही सूचना त्यांनी  केल्या.

बैठकीनंतर  शिक्षण विभागामार्फत राबविण्यात आलेला नाविन्यपूर्ण प्रकल्प (सांगली पॅटर्न) पाटण विधानसभा मतदारसंघात राबविण्याबाबत श्री.देसाई यांनी माहिती घेतली.

0000  

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.