प्रशासकीयब्रेकिंग न्युज

‘पिझोमिटर’मुळे भूजल पातळीचा अचुक अंदाज करता येणार – राज्यमंत्री बच्चू कडू

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि. 30 : गेल्या काही वर्षांपासून उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे भूजल पातळीत सात्यत्याने घट होत आहे. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वर्तमान परिस्थितीत भूजल साठा जतन करणे, जमिनीतील पाणी जपून वापरणे ही काळाची गरज आहे. अटल भूजल योजनेअंतर्गत पिझोमिटर (भुजल मापक यंत्र) कूपनलिका स्थापनेमुळे भूजल पातळीचा अचुक अंदाज करता येणे आता शक्य होणार असल्याचे प्रतिपादन  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले.

चांदुर बाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथे पिझोमिटर कुपनलिका स्थापनेचा शुभारंभ राज्यमंत्री श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कुरळपूर्णाच्या सरपंच किरण धुर्वे, उपसरपंच मुकुंद मोहोड, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा कार्यालयाचे उपसंचालक संजय कराड, वरीष्ठ भूवैज्ञानिक हिमा जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

विविध शासकीय  विभागाच्या समन्वयातुन गावाचा विकास

अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल पुनर्भरण, जलसंधारण, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाण्याची बचत करण्याचे विविध उपाय लोकसहभागातून करण्यात येणार असल्याचे प्रस्तावीत आहे. प्रत्येक गावाचा जलसुरक्षा आराखडा तयार करून कृषी, महसूल, जलसंधारण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सिंचन विभाग आदी शासकीय विभाग व लोकसहभाग यांच्या समन्वयाने गावाचा विकास करण्याची अभिनव पद्धती या योजनेतून साकारण्याचा शासनाचा मानस असून या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीमधील 207 गावांमध्ये करण्यात येणार आहे. अतिशोषित क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या वरुड, मोर्शी व चांदुर बाजार येथील भूजल पातळीत वाढ करून पाण्याची  गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी पुढील चार वर्षे ही योजना राबविण्यात येणार आहे. जागतिक बँक, अटल भूजल योजनेतंर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत गावाच्या जल पातळीचे सहनियंत्रण पिझोमिटर यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

यावेळी भुवैज्ञानिक प्रतिक चिंचमलादपुरे, इंद्रजीत दाबेराव, नामदेव झोंबाडे, माहिती संवाद तज्ञ दिनेश खडसे, कृषी अधिकारी नितीन तट्टे, भूवैज्ञानिक संस्था जिल्हा अंमलबजावणी भागीदारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. यशवंत पांडे आदी उपस्थित होते.

 

0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button