स्वस्त धान्य दुकादारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 1 : स्वस्त धान्य दुकादारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या दुकानांवर स्वस्त धान्याव्यतिरिक्त काही वस्तू विकण्यास परवानगी देण्यात आली असून त्यात स्टेशनरीचा समावेश आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मंत्रालयात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे  केंद्रीय अध्यक्ष पुष्पराज देशमुख, राज्य संघटना अध्यक्ष, डी.एन पाटील, उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, चंद्रकांत यादव, विजय पंडित, प्रभाकर पाडले यांच्यासह महाराष्ट्रभरातून आलेले स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक समस्या आहेत. त्यातल्या काही मागण्या केंद्र सरकारशी निगडित आहेत. शासन त्याबाबत देखील पत्रव्यवहार करत आहोत. स्वस्त धान्य दुकानदारांना धान्याव्यतिरिक्त अन्य पदार्थ विकायला शासनाने परवानगी दिली आहे. त्यात स्टेशनरी, शाम्पू, साबण, डिटर्जंट, हॅण्डवॉश, चहापत्ती, कॉफी या वस्तूंचा समावेश आहे. येणाऱ्या काळात आणखी काही गोष्टींचा समावेश यात करण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी दिली.

स्वस्त धान्य दुकानदारांच्या धान्य पुरवठा आणि अन्य काही मागण्यांबाबत आगामी काळात बैठक आयोजित करून ते प्रश्न देखील तातडीने सोडवू, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.