अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेश धोरण निश्चितीसाठी समिती

आठवडा विशेष टीम―

मुंबई दि, 3 : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत दहावीनंतर तांत्रिक पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धोरण निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

समितीचे सदस्य सचिव म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, जि. रायगडचे कुलसचिव असतील. समितीत अन्य 5 सदस्य असतील.

समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे आहे:

(१) दहावीनंतर तांत्रिक पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यासाठी असलेल्या धोरणाचा आढावा घेऊन आवश्यक असल्यास सुधारीत धोरणाची शिफारस करेल.

(२) उद्योगांसाठी आवश्यक असणारे पदविकास्तरीय कुशल मनुष्यबळ, रोजगार वाढीचा दर, तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्याची उपलब्ध संख्या आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त जागा यासाठी सदर समिती बृहत योजना तयार करेल.

(३) समिती अभियांत्रिकी शिक्षणासह तंत्रनिकेतन शिक्षण यामधून पदवी/पदविका प्राप्त करून बाहेर पडणाऱ्या कुशल मनुष्यबळाची उद्योगांना आवश्यक असणारी आवश्यकता यामधील ताळमेळ साधण्याबाबतची यंत्रणा कशी असावी, याचा आराखडा तयार करेल.

(४) यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून शासनास शिफारस करेल.

(५) डॉ. माशेलकर समितीच्या अहवालातील मुद्यांशी संबंधित शिफारशींचाही समिती विचार करून मार्गदर्शक सूचना निश्चित करेल.

समितीने अहवाल शासनास तीन महिन्यात सादर करावा, असे म्हटले आहे.

000

नारायणकर, उपसंपादक/3.6.2022

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.