बचत गटांना संधी देण्यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर विक्री मॉल उभारणार

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि. 4:  मानकापूर क्रीडासंकुलात काल आलेल्या ग्रामीण भागातील महिला केवळ कार्यक्रमासाठी नव्हे तर त्यांना जी आपण स्वप्न दाखवली आहे. त्याची उत्तरे शोधायला आणि संधी शोधायला आल्या होत्या. आता आमची जबाबदारी वाढली असून उद्योगउत्सुक असणाऱ्या ग्रामीण भागातील या महिलांसाठी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा व तालुका स्तरावर मॉल व विक्री केंद्र उभारणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय , युवक कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.

             मलकापूर क्रीडासंकुलात आज त्यांनी भेट दिली. त्यांच्या पुढाकारातून शुक्रवारपासून या ठिकाणी विभागीय सरस मेळावा व जिल्हास्तरीय महिला मेळावा सुरु झाला आहे. काल १२ हजार महिला मानकापूर क्रीडा संकुलात उद्योग, व्यवसाय उभारणी संदर्भातील मार्गदर्शन, यशकथा व प्रबोधन घ्यायला उपस्थित होत्या. कालच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कौतुक केले.

            कालच्या मेळाव्यात आलेल्या महिलांनी एक जबाबदारी आपल्यावर सोपविली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला गती देण्याची ही उत्तम संधी असून जे प्रयोग बारामतीमध्ये सुनंदा पवार यांनी केले. तेच प्रयोग नागपूर ग्रामीणमध्ये करण्याची पार्श्‍वभूमी तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.

            ग्रामीण भागात प्रत्येक घरात असणारी महिला, सून, मुलगी आता सुशिक्षित आहे. आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा सक्षम करण्याची तिची इच्छा आहे. तिने घेतलेले शिक्षण तिला वाया घालवायचे नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था गतिशील करण्याची ही संधी समजून कामी लागावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            बचत गटाचे, गृह उद्योगाचे आणि समूह उद्योगाचे स्वप्न घेऊन काल महिला या ठिकाणी आल्या होत्या. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था नीट करण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी व्यवस्था उभी करावी लागेल, अशी एक यंत्रणा तयार करावी लागेल ज्या मार्फत त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. त्यातून त्यांना अर्थसाह्य होईल,त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ज्या मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. त्या जिल्ह्याच्या ठिकाणी असोत वा तालुक्याच्या ठिकाणी असोत या ठिकाणी विक्री केंद्र, छोटे मॉल उभे करावे लागतील. त्यासाठी जिल्हा परिषदेने पुढे यावे, यासाठी लवकरच अशा पद्धतीची यंत्रणा उभी करणे आवश्यक असून नागपुर जिल्हा परिषदेने हा आदर्श पुढे करावा असे स्पष्ट निर्देश त्यांनी आज याठिकाणी दिले.

            तत्पूर्वी, जिल्हा परिषदेच्या वतीने सुनील केदार यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुमित्राताई कुंभारे, सभापती तापेश्वर पुंडलिक वैद्य, सभापती उज्वला बापू बोढारे, जिप सदस्य अवंतिका लेकुरवाळे, कुंदा राऊत, रवींद्र भोयर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे विवेक इलमे आदी उपस्थित होते.

मानकापूर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या विभाग स्तरीय सरस महोत्सव व जिल्हा महिला मेळाव्याचा रविवार हा शेवटचा दिवस असून मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रदर्शन बघण्यासाठी व खरेदीसाठी यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

            मानकापूर येथे क्रीडा संकुलात सुरू असलेला हा विभाग स्तरीय सरस मेळावा आहे. त्यामुळे या मेळाव्यामध्ये नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांचे स्टॉल लागले आहेत. काल पहिल्याच दिवशी या स्टॉलवर १७ लाखांची विक्रमी उलाढाल झाली आहे.

            यामध्ये नागपूर जिल्ह्याच्या स्टॉलवर ७ लक्ष ७१ हजार, वर्धा जिल्हा १ लक्ष ५८ हजार, चंद्रपूर जिल्हा २ लक्ष ४२ हजार, भंडारा जिल्हा २ लक्ष ५५ हजार , गोंदीया जिल्हा १ लक्ष ७३ हजार , गडचिरोली १ लक्ष २२ हजार, असा एकूण सतरा हजाराची विक्री शुक्रवारी पहिल्या दिवशी झाली आहे.

            शनिवार व रविवार मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी येतील व विविध जिल्ह्यातून आलेल्या स्टॉलवर खरेदी करतील, अशी अपेक्षा आहे. नागपूर सारख्या महानगरांमध्ये लागलेल्या प्रदर्शनात आपल्या दर्जेदार वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांनी अतिशय तयारीने या ठिकाणी आपले स्टॉल सजविले आहे. त्यांचे कौतुक करण्यासाठी व आपल्या परिवारासोबत विकेन्ड साजरा करण्याकरिता या ठिकाणी घेण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे.

            ग्रामीण भागातील पारंपारिक हस्तकला, सेंद्रिय शेतीतील खाद्यान्न, खमंग शाकाहारी मांसाहारी खाद्यपदार्थ, पुरणपोळी चटपटीत खाद्यपदार्थ ,लोणचे, घरांतील सजावट वस्तू, यासोबतच विविध शरबत असे सर्व जिन्नस मानकापूर क्रीडासंकुलमध्ये महिला बचत गट मेळाव्यांमध्ये उपलब्ध आहे.

            चादर कपडे यापासून तर घरगुती वापराच्या वेगवेगळ्या वस्तू देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोफत आरोग्य तपासणीचा लाभ या ठिकाणी घेता येतो. बीपी, शुगर,तपासणी करता येते. याशिवाय सिकलसेल सारख्या आजाराची मोफत तपासणी देखील या ठिकाणी केली जाते.

नागरिकांनी मोठ्या संख्येने याठिकाणी खरेदीसाठी, प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी, यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.