आठवडा विशेष टीम―
औरंगाबाद, दिनांक (04) : वैजापूर तालुक्यातील कनक सागज प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातून येथील ग्रामस्थांना उत्तम सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
कनक सागजच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण डॉ.गोऱ्हे यांच्याहस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास आमदार रमेश बोरनारे, अविनाश पाटील गलांडे, सरपंच सुनीता भुजाडे, साबेरभाई, भरत कदम आदींची उपस्थिती होती.
कनक सागज आरोग्य केंद्रात लहान वयोगटापासून महिला, ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांची सेवा होण्यास मदत होणार आहे. त्यासह गावात वाचनालय, महिलांसाठी उद्यान वा जिमसाठी आमदार निधीतून पाच लाख रुपये देणार असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
सुरुवातीला फीत कापत, कोनशिलेचे अनावरण करून डॉ. गोऱ्हे यांच्याहस्ते इमारतीचे लोकार्पण झाले. त्यानंतर त्यांनी इमारतीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने डॉ.गोऱ्हे यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनतर त्यांनी हनुमंतगाव ते चिंचडगाव रस्त्याचे भूमिपूजन डॉ.गोऱ्हे यांच्याहस्ते झाले. यावेळी हनुमंतगाव, चिंचडगाव ग्रामस्थांची उपस्थिती होती.