आठवडा विशेष टीम―
पुणे दि.५- पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. ज्या भाविकांनी कोरोना लशीची दुसरी मात्रा किंवा वर्धक मात्रा घेतली नसेल त्यांना ती घेण्याबाबत आवाहन करण्यात यावे, यासाठी लसीकरणाची सुविधा करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२२ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, पालखी सोहळ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना सोहळा पूर्ण होईपर्यंत कार्य मुक्त करू नये. पंढरपूर येथे फिरते शौचालय आणि टँकरची व्यवस्था वाढविण्यात यावी. शहरात पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक नियोजनासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सूचना कराव्यात, आवश्यक व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी खर्च करावा आणि प्रस्तावही पाठवावा. सुविधांसाठी पालखी तळ असलेल्या गावांना सुविधेसाठी निधी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल.
पालखी मार्गावरील वाहतूक नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाय करावेत, सर्वांनी मिळून प्रशासनाला सहकार्य करावे. आळंदीला वाहनतळासाठी जागा संपादन करावे , त्यासाठी सहकार्य करण्यात येईल. सोपानदेव पालखी मार्गावरील रस्त्यातील खड्डे जिल्हा परिषदेने त्वरित बुजवावे. पालखी मार्गावरील शासकीय जागेची सुविधेच्यादृष्टेने माहिती घेऊन अशा जागा पालखी सोहळ्यासाठी कायमस्वरुपी आरक्षीत करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी सांगितले. पालखी सोहळा चांगल्यारितीने संपन्न व्हावा यासाठी शासन प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विभागीय आयुक्त श्री. राव यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. अधिकारी आणि सोहळा प्रमुखांच्या संयुक्त पाहणीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वारीमध्ये लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. शौचालय स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी वारी ॲपचे उद्घाटन
बैठकीत आषाढी वारीबाबत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. या ॲपमध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा व मुक्कामचे ठिकाण, पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, टँकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाईव्ह पंढरपूर दर्शन आदी महत्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात तयारी अंतिम टप्प्यात
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी पुणे जिल्ह्यात केलेल्या पूर्वतायरीची माहिती दिली. जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहे. पालखी मार्गावर महिलांसाठी ५ किमी अंतरावर शौचालय सुविधा करण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी ३७ विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत आणि ७० टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८७ फिरते वैद्यकीय पथक आणि १०८ रुग्णवाहिकेद्यारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहे.
अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्याचे नियेाजन आहे. पालखी मार्गावर प्रस्थानाच्या वेळी ठरावीक मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील नियोजन
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधा व दुरुस्ती करण्यात येत आहे. नीरा नदीवरील पुलाची दुरुस्ती करण्यात येत आहे. पाडेगाव घाटाची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात येत आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील नियोजन
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. पालखी आणि रिंगण सोहळ्याच्या नियोजनासाठी २१ आपत्ती व्यवस्थापन केंद्र तयार करण्यात आले आहेत. एकूण १ हजार अधिकारी आणि २५ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. यशदामार्फत अधिकाऱ्यांना, मंदिर व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पंढरपूर शहरात पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे, यापैकी कायमस्वरूपी २४ हजार आहेत. एकूण ४९ टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी पत्रा शेड तयार करण्यात आले आहे. पुलांचे काम सोडून इतर कामे १५ जूनपर्यंत पूर्ण होतील असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
यावेळी पालखी प्रमुखांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले. बैठकीस तिन्ही जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, पालखी सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते