आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 6 : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येत असलेल्या भाषा भवनचे अंतर्गत स्वरूप निश्चित करण्यासाठी आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. मराठी भाषा भवन सर्व मराठी प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
मराठी भाषा भवनचे स्वरुप ठरवण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी, प्रा. हरी नरके, डॉ. राजा दीक्षित, डॉ. सदानंद मोरे, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. सतीश बडवे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे संचालक सव्यसाची मुखर्जी, रचनाकार भूपाल रामनाथकर, मराठी भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते.
भाषा भवनचे एकूण स्वरुप कसे असावे, मराठी भाषेचा एकूण प्रवास, कालखंड, भाषेचे वैभव, जागतिक पातळीवर असलेले स्थान आदी बाबींवर भाषा अभ्यासकांनी सूचना मांडल्या. मराठी भाषा भवन आमच्यासाठी अभिमानाचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. यासाठी राज्य शासन सर्वतोपारी मदत करेल, असे श्री. देसाई म्हणाले.
श्री. हरी नरके यांनी प्राचीन कालखंड, डॉ सतीश बडवे यांनी मध्य युगीन कालखंड तर प्रा. रा. रंगनाथ पठारे यांनी आर्वाचिन मराठीचा कालखंड आणि त्यातील बारकावे विशद केले. मराठी भाषेचे अभ्यासक पर्यटक, लेखक, विद्यार्थी, परभाषिक पर्यटक या सर्वांना यात आवडेल असे काही ना काही मांडायचे आहे आणि लोक परत परत भेट देतील, यासाठी तंत्रज्ञान वापरावे, अशी सूचना मांडण्यात आली. प्रास्ताविक राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी केले.
• मराठी भाषा भवनाच्या रचनेकडे स्वतः मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. मराठी भाषा भवनाची उभारणी हा राज्य शासनाच्या कामगिरीतील मैलाचा दगड ठरेल अशी त्यांची धारणा आहे. – मा. मंत्री, मराठी भाषा
• जगातील ७००० भाषांपैकी मराठी ही बोलली जाणारी १७वी भाषा. भाषा भवनचे काम मराठीची महती जगापर्यंत पोहोचवणे हे आहे.
— डॉ. गणेश देवी
• मराठी भाषा भवनात मराठीतील दिग्गज व्यक्तींच्या शिल्पांची उभारणी व्हावी. कोरीव लेखांच्या मूळाबरहुकूम प्रतिकृती असाव्यात. प्राचीन काळातील लेखनसाधने उदा. भूर्जपत्र इ. आणि ती वापरून लेखन कसे होत असे ह्याचे दर्शन दृकश्राव्य माध्यमातून घडवण्यात यावे. – डॉ. हरी नरके
• मराठी ही भाषिक संयोगाची भूमी आहे. मराठी भाषा भवनात भाषा, तिच्या बोली आणि लिप्या ह्यांवर स्वतंत्र दालने असावीत. – डॉ. राजा दीक्षित
• हे मराठी भाषा भवन भारतात पहिलेच भाषिक संग्रहालय ठरू शकते. अन्य राज्यांसाठी ते आदर्श ठरणारे असल्याने त्याच्या उभारणीत बारकाईने विचार व्हायला हवा. — श्री. सव्यसाची मुखर्जी
• मराठी भाषा भवनाची निर्मिती हे महाराष्ट्र शासनाचे एक मौलिक काम आहे. मराठी भाषेचा व साहित्याचा विस्तार केवळ महाराष्ट्र प्रदेशापुरता सीमित नाही. बृहन्महाराष्ट्रातील ग्रंथसंपदा उपलब्ध करता आली तर मराठीच्या मध्ययुगीन काळातील विस्ताराचे व वैभव संपन्नतेचे दर्शन भाषिक वस्तू संग्रहालयातून घडू शकेल. – डॉ. सतीश बडवे
००००