आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील सुविधा विकासासाठी एकत्र यावे – पालकमंत्री बच्चू कडू

आठवडा विशेष टीम―

अकोला,दि.6(आठवडा विशेष)- जिल्ह्यातील ग्रामिण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास करणे तसेच आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रित काम करावे. आरोग्य आणि शिक्षणाच्या विकासासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र येऊ या, असे आवाहन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व आमदार महोदय व सदस्यांना केले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवनात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, आ. अमोल मिटकरी, आ. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपवनसंरक्षक के. आर. अर्जूना, उपायुक्त नियोजन किरण जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, सहायक नियोजन अधिकारी कैलास देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे तसेच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत प्रारंभी गत बैठकीचे इतिवृत्त व अनुपालन अहवालावर चर्चा झाली.  तसे सन 2021-22 च्या मार्च अखेरील खर्चास पुनर्विनियोजनासह मान्यता प्रदान करण्यात आली.  तसेच जिल्हा वार्षिक योजना 2022-23 अंतर्गत झालेल्या खर्चास (25 मे 2022 अखेर) मान्यता प्रदान करण्यात आली.  सन 2021-22 मध्ये जिल्ह्यात 80 पाणंद रस्त्यांचे काम महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अभिसरण योजनेतून हाती घेण्यात आले, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 9 कोटी 27 लक्ष रुपयांच्या निधी मागणी करण्याचा प्रस्ताव सादर करणे, 2020-21 मधील 99 पाणंद रस्त्यांसाठी वाढीव खर्च 2 कोटी 50 लक्ष रुपये  मंजूरीसाठी विषयावर चर्चा करण्यात आली.तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक 2 साठी 13 कोटी 80 लक्ष रुपये उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक योजनेतून सात टक्के संभाव्य बचतीतून पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करुन देण्यासही मान्यता देण्यात आली. तसेच जिल्ह्यात तालुकानिहाय नविन आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठी बृहत आराखड्यास जिल्हा नियोजन समितीची मान्यता देण्यात आली.

आमदार महोदयांनी तसेच अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर पालकमंत्री कडू यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्यासंदर्भात लवकरच (दि.11 किंवा 12 )मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे बैठक होऊन त्यात निर्णय होईल. जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांच्या दुरुस्ती वा बांधकामासाठी देण्यात येणारा निधी हा त्या त्या शाळेच्या दुरुस्तीचा प्राधान्यक्रम ठरवून देण्यात येईल. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शिक्षण आरोग्य सुविधांच्या विकासाला सर्व सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामिण भागात अग्निशमन सुविधा उपलब्धतेसाठी बाजार समित्यांना अग्निशमन बंब उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. पूर्णा नदीत अमरावती जिल्ह्यातून येत असलेल्या प्रदूषित पाण्यासंदर्भात अमरावती येथे बैठक घेऊन उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केले.

00000

बियाणे महोत्सव

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;विक्रमी 10 हजार 173 क्विंटल बियाण्याची विक्री

महोत्सव राज्यस्तरीय करण्यासाठी प्रयत्न करु –  पालकमंत्री बच्चू कडू

अकोला,दि.6(आठवडा विशेष)- शेतकऱ्यांना बियाणे विक्री व खरेदीसाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या बियाणे महोत्सवाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महोत्सवात विक्रमी 10 हजार 173 हजार क्विंटल बियाण्याची खरेदी व विक्री होऊन तब्बल 29 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यासोबतच हा उपक्रम राज्यस्तरावर नेण्यासाठी आपण प्रयत्न करु, असा विश्वास राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला येथे व्यक्त केला.

कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला येथे बियाणे महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते  बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.कांताप्पा खोत, कृषी उपसंचालक संध्या करवा, प्रगतीशील शेतकरी महादेवराव भुईभार,कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जामुरणकर, मंडल कृषी अधिकारी प्रदीप राऊत, आर.एच.राखोडे, कृषी अधीक्षक गजानन महल्ले, एचडीएफसी ईगोचे जिल्हा प्रतिनिधी रुपेश दिक्षीत, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले की, शेतकरी असलेल्या बियाणे उत्पादकांचा माल शेतकऱ्यांनी बाजारापेक्षा स्वस्तात खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांची बचत झाली. तर उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ झाली. हा उपक्रम दरवर्षी राबविण्याचा निर्धार यावेळी त्यांनी यावेळी व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य विक्री केंद्रासोबतच बियाणे विक्री केंद्र म्हणून नावलौकीक येत आहे. या महोत्सवाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून विक्रमी बियाणे खरेदी केली आहे. जिल्ह्यात प्रथमच बियाणे उत्पादक कंपन्यापेक्षा शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बियाण्याची विक्री जास्त झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.  उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन बियाणे प्रक्रिया व साठवण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वेतोपरी मदत करु. तसेच शेतकरी व उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुढील वर्षी बियाणे महोत्सव मे महिन्यापासून सुरु होईल, याकरीता नियोजन करण्याचे सूचना कृषी विभागाला दिल्या. शेतकरी उत्पादकांनी बियाणांचा दर्जा कायम ठेवावा. शेतकऱ्यांचा विश्वासाला तडा जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात व उत्पादक शेतकऱ्यांना  आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे, यासाठी बियाणे महोत्सवाचे आयोजन दि. 1 ते 6 या कालावधीत प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आले.  या महोत्सवात  21 हजार 017 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 10 हजार 173 क्विंटल बियाणे विक्रीतून 29 कोटी 13 लक्ष 52 हजार रुपयांची खरेदी झाली. महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याबाबत कृषी विभागाचेअभिनंदन व कौतूक केले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी स्वत:चे निविष्ठा स्वतः तयार करु  किंवा शेतकरी उत्पादकांकडून निविष्ठा खरेदी करु, अशी शपथही पालकमंत्री कडू यांनी उपस्थितांना दिली.

00000

महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

रुग्ण सेवा हाच खरा धर्म-पालकमंत्री बच्चू कडू

शासकीय आरोग्य यंत्रणेने सात तालुक्यात अथक परिश्रम केल्यामुळे  जिल्ह्यातील शेकडो महिलांना मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचा लाभ झाला आहे. या शिबीरामध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामे कौतुकास्पद असून रुग्ण सेवा हाच खरा धर्म आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

महिला आरोग्य तपासणी शिबिरांचा समारोप आज जिल्हा स्त्री रुग्णालयात पार पडला. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. आरती कुलवाल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगदीश बनसोडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार, प्रशासकीय अधिकारी डॉ. आप्पा डांबरे, डॉ. चिमणकर, डॉ. मोहिते, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, अधीपरिचारिका व महिला रुग्ण उपस्थित होते.

पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले की,  दि. 30 मे ते 6 जूनपर्यंत महिलांकरीता मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीरांचे आयोजन केले. याशिबीरात जिल्ह्यातील महिलांनी मोठया प्रमाणात सहभागी होवून तपासणी व उपचार घेतला. या शिबीरामुळे महिलांमध्ये लहान व मोठे आजाराचे लक्षणे दिसून आले. महिलांनी अंगावर दुखणे काढल्यामुळे त्यांना मोठे आजार असल्याचे या शिबीरातून लक्षात आले. महिलांनी घाबरुण न जाता आपल्यावर विनामुल्य शस्त्रक्रिया व उपचार करु. याकरीता जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वा खाजगीस्तरावरही आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतील. येथेही उपचार शक्य नसल्यास मुंबई वा अन्य मोठ्या शहरात नेऊन मोफत उपचार करण्याचा निर्धार व्यक्त केला. या शिबीराकरीता झटणाऱ्या आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी, आशा सेविका या साऱ्यांचे पालकमंत्र्यांनी कौतूक केले.

आरोग्य तपासणी शिबीरास महिलांना आरोग्य यंत्रणेमार्फत प्राथमिक तपासणी करुन रुग्णालयापर्यंत आणण्यात आले. येथे त्यांची सर्व तज्ज्ञांमार्फत तपासणी, निदान व अनुषंगिक उपचार करण्यात आले. या शिबिरात स्त्रियांचे विविध आजार, कर्करोग, रक्ताचे विकार, त्वचा विकार, किडनीचे आजार, हाडांचे विकार, दातांचे विकार या सह विविध आजारांवर उपचार करण्यात आले. त्यात 6625 महिलांचे 7697 विविध आजारांची तपासणी करण्यात आले. तर 363 रुग्णांची मोठया शस्त्रक्रिया व 362 रुग्णांची लहान शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. या महिला रुग्णांवर जिल्हा स्त्री रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. आरती कुलवाल यांनी दिली.

000000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.