छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहाेचविण्याचा प्रयत्न – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

आठवडा विशेष टीम―

सातारा, दि.६ (जिमाका): शिवस्वराज्य दिन ६ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहाेचविण्याचा प्रयत्न असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

शाहू कला मंदिर येथे शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. सामंत बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, नितीन बानगुडे पाटील आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर खंड तयार करण्यात येणार आहेत. हे खंड सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शिवस्वराज्य दिन हा महाराष्ट्राची अस्मिता जपणारा दिवस असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवस्वराज दिनानिमित्त साताऱ्यात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

श्री. पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्षातून व त्यागातून रयतेचे राज्य उभे केले. त्यांच्या विचाराचा आदर्श समोर ठेऊन शासन काम करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा युवकांनी प्रयत्न करावा.

युवकांनी युपीएससी व एमपीएससीच्या माध्यमातून प्रशासन सेवेत यावे. यामुळे कुटुंबाचे परिवर्तन तर होतेच व समाजाचीही सेवा करण्याची संधी उपलब्ध होते. कोरोना संसर्ग पुन्हा वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले.

श्री. देसाई म्हणाले, मुलांच्या शिक्षणासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अनेक चांगल्या योजना आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आणि कार्याचे स्मरण करून पुढील वाटचाल करावी.

या कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी शिवस्वराज्य दिनानिमित्त पोवई नाका ते शाहू कला मंदिर शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सहभाग घेतला.
00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.