हाफकिनने कोविड चाचणी प्रमाणीकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून करुन घ्यावे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 7 : हाफकिन प्रशिक्षण, संशोधन संस्था आणि रिसॉल्व्ह डायन्गोस्टिक कंपनीने कोविड चाचणी करता येईल असे ‘सलाईव्हा सॉल्व्ह किट’ तयार केले आहे. या किटच्या माध्यमातून कोविड चाचणी करता येणार असून हाफकिनने कोविड चाचणी प्रमाणीकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून करुन घ्यावे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

हाफकिन प्रशिक्षण, संशोधन संस्थेने तयार केलेल्या कोविड किटबाबतचे सादरीकरण आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालक सीमा व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह हाफकिन संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, कोविड चाचणी किट कसे असावे याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने काही नियम ठरविले आहेत. यानुसार हे किट काम करते का हे तपासून घेणे आवश्यक आहे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे किट वापरताना काही अडचणी येतात का याचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

राज्यात कोविड टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून या फोर्सकडेही हे किट किती उपयुक्त आहे याबाबतचा अहवाल घेण्यात यावा. येणाऱ्या काळात हे किट मुंबईतल्या सेंट जॉर्ज, कस्तुरबा हॉस्पीटल येथे पाठविण्यात यावे. तसेच हे किट कसे आहे, हॉस्पीटलमध्ये उपलब्ध केल्यावर डॉक्टरांना या किटद्वारे रुग्णांची कोविड तपासणी करता येऊ शकेल का हे सर्व तपासून घेण्यात यावे असे निर्देशही श्री.देशमुख यांनी दिले.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/7.6.22

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.