विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा

आठवडा विशेष टीम―

अलिबाग, दि.09 (जिमाका) :- राज्यातील बारावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वच स्तरावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोकण बोर्डाची स्थापना झाल्यापासून राज्यात प्रथम क्रमांक पटकविण्याची परंपरा कोकण विभागाने कायम ठेवली आहे. यंदाही (97.21 टक्के) उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या स्पर्धेमध्ये राज्यात अव्वल स्थान मिळविले. मुंबई विभागातील रायगड जिल्हा (93.11 टक्के) निकालाने पहिल्या क्रमांकावर असून त्यात 94.72 टक्के मुली परिक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. बोर्डाची गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छांसह त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी ज्या सचोटीने अभ्यास केला त्याचप्रमाणे करिअर निवडताना योग्य ती काळजी घ्यावी, विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असा सूचक सल्ला जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यंदाच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्या.

कोरोनामुळे कॉलेजमध्ये प्रत्यक्ष उपस्थित न राहता थेट परीक्षा व त्यात घवघवीत यश संपादन केलेल्या राज्यातील सर्व गुणवंत, यशस्वी विद्यार्थ्यांचे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यंदा राज्यातील सुमारे 13 लाख विद्यार्थी-विद्यार्थीनी बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. पुढील शिक्षण व क्षेत्र निवड करतेवेळी अनेकदा कोणताही योग्य सल्ला वा मार्गदर्शनाशिवाय निवड केल्यामुळे भविष्यात निराशाजनक परिस्थितीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो. त्यामुळे योग्य मार्गदर्शन शिबीर, विशिष्ट्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला व ॲप्टीट्यूड (कल व पात्रता चाचणी) तयारी याचा सर्वकष विचार कोणत्याही क्षेत्राकडे वळताना करावा. तरुणांनी शिक्षणातील महत्त्वाच्या टप्प्यांवर असताना आपला अमूल्य वेळ वाचवावा, आपला वेळ योग्य ठिकाणी सत्कारणी लावावा, असे आवाहन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यंदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना केले.

रायगड जिल्ह्यातील बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची विशेष कामगिरी

सर्वत्र आलेल्या कोरोनाच्या संकटासह गेल्या वर्षी कोकण किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळे, अतिवृष्टी, पूर व भू:स्सखलनासारख्या आपत्तींमुळे कोकणातील रायगड जिल्ह्यास मोठ्या आव्हानांचा सामाना करावा लागला. या आसमानी संकटांवर मात करीत अनेक कुटुंबातील विद्यार्थी- विद्यार्थींनींनी यंदा बारावीच्या परिक्षेस नेटाने व जिद्दीने सामोरे जात उत्तीर्ण टक्केवारीत विभागातील अव्वल जिल्हा म्हणून स्थान मिळविले. या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे विशेष कौतुक राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले असून त्यांना त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.