प्रशासकीय

प्लास्टीक बंदीची अपरिहार्यता…!

आठवडा विशेष टीम―

आज आपण मोठ्या प्रमाणावर प्रदुषण करतो आणि प्रदुषित परिस्थितीत जगतो.  आपणाकडे दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही.  सहज सोपे उपाय आहेत पण आपली जुनी जीवनशैली बदलल्यामुळे आपण या प्रदुषणास रोज हातभार लावतोय आणि आता याचे दुष्परिणाम दिसायला लागले आहेत.  या प्रदुषणात नव्या युगाचे प्रदुषण म्हणता येईल तसे प्लास्टीकचे प्रदुषण होय.

प्लास्टीक हा शब्द पिलायबल अँड इझीली शेपड् अर्थात लवचिक आणि आकार देण्यास सोपा पदार्थ होय.  प्लास्टीक रासायनिक प्रक्रिया करुन बनवलेला पदार्थ आहे तो नैसर्गिक नाही मात्र तो वापरास सोपा असल्याने भांडवलशाही वृत्तीने याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढविण्याचा प्रकार 80 च्या दशकात घडला.  वास्तविक प्लास्टीकचा शोध 1862 साली अलेक्झांडर पार्कस यांनी प्रथम लावला होता.

प्लास्टीकचा शोध लागल्यानंतरही त्याचा वापर फारसा झाला नाही.  1907 साली हस्तीदंताला पर्यायी पदार्थाचा शोध लावताना बनलेला प्लास्टीक पासून बेल्जिअन अमेरिकन शास्त्रज्ञ लिओ बिकिलँड याने रासायनिक प्रक्रियेतून सर्वप्रथम सिंथेटीक (कृत्रिम) प्लास्टीक निर्माण केले.  असे असले तरी दुसरे महायुध्द संपेपर्यंत याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार झाला नव्हता.

भारतात 1957 साली प्लास्टीकने प्रवेश केला.  प्लास्टीक लवचिक असल्याने कोणत्याही आकारात बदलणे शक्य आहे तसेच ते स्वच्छ ठेवण्यास सोपे आहे.  पाण्याचा यावर परिणाम होत नाही आणि ते टिकाऊ आहे या साऱ्या गुणांमुळे नंतरच्या काळात प्लास्टीकची मागणी वाढली पाठोपाठ उत्पादन देखील वाढत गेले.

भारतात 1980 सालापर्यंत दुधासाठी काचेच्या बाटल्या आणि इतर पदार्थांसाठी स्टीलचे डबे भाजीपालासाठी कापडी पिशव्या यांचा वापर होत होता.  मात्र प्लास्टीकचा प्रसार आणि उपलब्धता वाढली तुलनेत प्लास्टीक स्वस्त असल्याने देखील मागणीत वाढ झाली.  येथून प्रदुषणालाही सुरुवात झाली.  प्रदुषण वाढायला लागले असे दिसून येईल.

टिकाऊपणा हा प्लास्टीकचा गुणधर्म असला व जमेची बाजू असली तरी त्यामुळेच पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे.  त्यापूर्वी माती किंवा काचेचा वापर होत होता.  माती पूर्णपणे मातीत सामावली जाते, विरघळते.  काचेपासून पुन्हा काच बनविता येते.  काच जमिनीवर अथवा पाण्यावर पडून राहिली तरी पर्यावरणास धोका नाही.

प्लास्टीक हे कार्बन संयुगातून बनते आणि त्याचे विघटन होत नाही.  मातीत वा पाण्यात प्लास्टीक पडून राहिले तर हळूहळू रासायनिक प्रक्रिया होवून त्यातील रासायनिक घटक प्रथम जमिनीत व नंतर भूजलापर्यंत जातात.  यात भूजलाचे प्रदुषण तर होतेच कालांतराने जमिनीची सुपीकता देखील नष्ट होते.

प्लास्टीकचा वापर योग्य पध्दतीने होत होता तोवर फारशी चिंता नव्हती.  1965 साली स्विडीश कंपनी सेलोप्लास्ट मधील एक अभियंता स्टेन गुस्ताफ थुलीन याने प्लास्टीक वापरुन पिशवी तयार केली.  याने हळूहळू जग बदलायला सुरुवात झाली.

1979 साली अमेरिकन प्लास्टीक कंपन्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी एकाचवेळी (सिंगलयुज) वापरायच्या प्लास्टीक बॅगचे मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग सुरु केले.  पुन्हा पुन्हा वापरता येतील अशा कापडी पिशव्या तसेच पेपरच्या पिशव्यांचे मार्केट काबीज करण्यासाठी हा सारा खटाटोप होता.  आणि त्यांना यश मिळायला लागलं.

अमेरिकेत 1982 साली मोठी सुपर मार्केट असणाऱ्या सेफ वे आणि क्रोगर या दोन्ही कंपन्यांनी आर्थिक लाभ आणि वेळेची होणारी बचत यासाठी सर्व बाबीत प्लास्टीक कॅरिबॅगचा वापर सुरु केला.  एव्हाना अमेरिकेत याची लोकप्रियता वाढून 80 टक्के जागा प्लास्टीक बॅगांनी घेतली.

वापरा आणि फेकून द्या (युज अँड थ्रो) प्रकारात प्लास्टीकचा वापर सुरु झाल्यावर कालांतराने काय होईल याची कल्पना न करता सर्वच देशांनी याचा वापर वाढवत नेला.  एव्हाना प्लास्टीकच्या या संकटाने भस्मासूराचे स्वरुप घेतले होते. आपल्याला कधी काळी कापडी पिशव्यांची सवय होती याचा आपल्याला पूर्ण विसर पडला.  या प्लास्टीक वापराचा कडेलोट हळू हळू सुरु होता.  परंतु बाटलीबंद स्वरुपात पाणी उपलब्ध झाल्यानंतर मात्र याची गती झपाट्याने वाढली.  वापरा आणि फेका असा प्रकार आपण सुरु केला.  भाजीपाला विक्रेते देखील स्वस्तातील कॅरिबॅग वापरायला लागले आणि सर्वत्र प्लास्टिकचे संकट जाणवायला लागले.

प्लास्टीक कॅरिबॅग आणि पाण्याच्या बाटल्या यांचे ढीग जागोजागी दिसायला लागले.  प्लास्टीकमध्ये अन्न टाकल्याने अजाणतेपणे ते अन्न खाताना प्राण्यांच्या पोटात प्लास्टीक गेल्याचे प्रकार सुरु झाले.  उडणाऱ्या कॅरिबॅग आणि पाण्याच्या बाटल्यांमुळे नाल्या, नद्यांमध्ये तसेच तलावांमध्ये पाणी तुंबण्यापासून अशुध्द होण्यापर्यंत प्रकार घडायला लागले.

धोक्याची घंटा सर्वप्रथम आपला शेजारी देश असलेल्या बांगलादेशाने वाजविली.  विस्तीर्ण नद्या आणि नैसर्गिक दृष्ट्या चक्रीवादळ क्षेत्रात असणारा हा देश.  चक्रीवादळ समुद्र जमिनीवर धाव घेतोय अशा स्थितीत नद्यांना आलेला पूर आणि प्लास्टीक कचरा साठल्याने पाण्याच्या निचऱ्या अभावी मोठे संकट कोसळल्यानंतर 2002 साली प्लास्टीक बंदीची जगात सर्वप्रथम घोषणा केली.  आपल्याकडे समुद्रालगत अनेक शहरे आहेत.  त्या शहरांमध्ये पाणी तुंबू नये यासाठी सातत्याने मेहनत आणि पैसा लागतोय हे लोण आता गावागावात पोहोचलय. पर्यटन केंद्रावर येणारे पर्यटक कचऱ्याचे ढीग निर्माण करुन जातात असे चित्र दुर्देवाने सर्वत्र दिसते.

सन 2011 सालच्या आकडेवारीनुसार जगभरात एका मिनीटाला 10 लाख प्लास्टीकच्या कॅरिबॅगचा वापर होत होता.  हा केवळ कॅरिबॅगचा आकडा आहे यात पाण्याच्या आणि कोल्डींकच्या बाटल्यांचे आकडे जोडल्यावर त्याचे गांभीर्य जाणवेल आणि या आकडेवारीला देखील 11 वर्षे झाली आहेत त्यामुळे सध्याचा आकडा काय असणार याची कल्पना देखील करवत नाही.

पाण्याच्या बाटल्या आणि कॅरिबॅग मोठ्या प्रमाणावर समुद्रात टाकली जातात यामुळे समुद्रात अनेक ठिकाणी प्लास्टीकचे मैलोनमैल पसरलेले साठे निर्माण झाले आहेत.  या प्लास्टीकमुळे सूर्यप्रकाश पाण्यापर्यंत पोहोचत नसल्याने समुद्री जीवसाखळी बाधित झाली आहे याचे समुद्री जीवनावर मोठ्या प्रमाणावर गंभीर परिणाम दिसून आले आहेत.

माणसाने कचरा म्हणून टाकलेले हे प्लास्टिक आता पाण्याच्या स्त्रोतातून अतिसूक्ष्म कणांच्या रुपात मानवी शरिरात दाखल झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. प्लास्टीक नकोच अशी भूमिका नाही कारण मोबाईल पर्यंतच्या सर्व महत्वाच्या शोधात व तंत्रज्ञानात प्लास्टीकचा खुप मोठा वाटा आहे.  या स्वरुपातील प्लास्टिक पुन्हा प्रक्रिया करुन वापरणे देखील शक्य असते.

आपण पर्यावरणासाठी किमान एकल वापर (सिंगल युज) प्लास्टीकचा वापर बंद करायला पाहिजे यामुळे अर्धी समस्या मार्गी लागणार आहे.  घरातही प्लास्टीकच्या वस्तू वापरणार नाही असे आपण ठरविले तर पारंपारिक व्यावसायिकांना व्यवसाय वाढवता येणार आहे.  आपली यासाठीची कटिबध्दता त्यासाठीही महत्वाची आहे.

01 जुलै पासून सिंगल युज प्लास्टीकवर बंदी येत आहे.  मुळात बंदी आणावी लागली याचा अर्थ आपल्याला आपल्या चुकांची जाणीवच नाही असा होतो.  कोस्टा-रिका देशाचे उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.  निश्चय केल्यानंतर या देशातील प्रत्येकाने राष्ट्रीय कार्य मानत त्याचा आदर केला त्यामुळे कोस्टा रिका देश आज प्लास्टिक मुक्त देश झाला आहे.

आपण कोठे आहोत.

  • प्रतिवर्षी देशभरात 3.5 दशलक्ष टन प्लास्टीक कचरा तयार होतो
  • गेल्या पाच वर्षात यात दुप्पट वाढ झालेली आहे.
  • यापैकी 43 टक्के प्लास्टीक पॅकिंगसाठी वापरले जाते ते सिंगल यूज प्लास्टीक आहे.
  • प्लास्टीक कचऱ्यापैकी 2 ते 2.35 दशलक्ष टनांचेच आपण सध्या रिसायकलींग करतो.
  • प्रशांत दैठणकर

जिल्हा माहिती कार्यालय,

रत्नागिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button