आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी युवक-युवतींना आयटीआयमधून मिळणार व्यवसाय प्रशिक्षण

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 10 : नक्षलग्रस्त जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात २ नवीन आयटीआय सुरु करण्यात येत असून यामध्ये नक्षलग्रस्त शरणार्थी किंवा त्यांच्या पाल्यांना राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नक्षलवादातून शरण आलेल्या व आत्मसमर्पण केलेल्या युवक-युवतींसाठी या आयटीआयमध्ये प्रवेशाकरिता गुणांकनाची कोणतीही अट असणार नाही, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केली.

मंत्री श्री. टोपे म्हणाले की, गोंदिया जिल्ह्यात पालांदूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि गडचिरोली जिल्ह्यात जिमलगट्टा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) या दोन नवीन आयटीआय यासाठी सुरु करण्यात येत आहेत. प्रवेश सत्र 2022 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. या विद्यार्थ्यांना आयटीआयच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून सूट देण्यात आली असून त्यांना संस्थास्तरावर प्रवेशाची संधी मिळणार आहे. नक्षली चळवळीतून शरण आलेल्या युवक-युवतींना कौशल्यावर आधारित रोजगाराभिमुख व्यवसाय प्रशिक्षण देणे आणि त्याद्वारे त्यांना मूळ प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. या दृष्टीने विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. टोपे म्हणाले की, या दोन्ही आयटीआयमध्ये मिळून एकूण ३६० विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. दोन्ही आयटीआयमध्ये जोडारी, विजतंत्री (इलेक्ट्रिशीयन), तारतंत्री (वायरमन), यांत्रिक मोटारगाडी आणि सुइंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल. पालांदूर येथील आयटीआय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर जिमलगट्टा (जि. गडचिरोली) आयटीआयच्या कार्यशाळा इमारत बांधकामासाठी १३ कोटी १८ लाख रुपयांच्या मान्यतेचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रक्रियेत आहे. सध्या हे आयटीआय अलापल्ली (जि. गडचिरोली) येथे तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात येत असून जिमलगट्टा येथील कार्यशाळा इमारत बांधकामास लवकरच मान्यता देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

नक्षलग्रस्त भागातील युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास ते अतिरेकी कारवायांकडे जाण्यापासून परावृत्त होतील. त्याचबरोबर यामुळे नक्षलवादी चळवळीला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री श्री. टोपे यांनी व्यक्त केला.

००००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.