प्रशासकीयब्रेकिंग न्युज

लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक; आकांक्षा निठुरेकडून कर्नाटकची मयुरी पराभूत

आठवडा विशेष टीम―

पंचकुला, ११ (क्रीडा प्रतिनिधी) – चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस आहे. प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण बनला आहे. एकेका सुवर्णपदकासाठी जोरदार लढाई सुरू आहे. लॉन टेनिसमध्ये सकाळीच महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) कांस्य पदक पटकावले. कडाक्याच्या उन्हात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरेने कर्नाटकच्या सुहिथा मयुरीचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. हा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. आकांक्षाने तीन सेटमध्ये (६-७, ७-६ व ६-४) हा सामना जिंकला.

पंचकुलातील जिमखाना मैदानावर ही चुरशीची लढत झाली. पहिल्या सेटमध्ये कर्नाटकच्या मुयरीने आघाडी घेतली होती. पहिले चार गुण मिळवल्यानंतर तिने सामन्यावर पकड बनवली. परंतु आकांक्षाने ४-४ आणि ५-५, ६-६ अशी बरोबरी साधली. परंतु ऐनवेळी मुयरीने गुण घेत पहिला सेट जिंकला.

दुसऱ्या सेटमध्येही पहिले पाच गुण घेऊन मयुरी पुढे होती. परंतु आकांक्षाने नंतर गिअर बदलला. फोरहँड, बॅकहॅंडचे फटके मारून तिने गुण घेण्यास सुरूवात केली. सहा-सहा गुण बरोबरी झाली. नंतर आकांक्षाने एक गुण घेत दुसरा सेट (७-६) जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली.

नेहमीप्रमाणे तिसऱ्या सेटमध्ये मयुरी आघाडीवर राहिली. पहिले चार गुण घेत तिने आकांक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आकांक्षा दोन गुणांवर होती. तेव्हापासून खेळाचा नूर पालटला. दोघीही एकेका गुणांसाठी झगडत होत्या. त्यांना प्रत्येकी तीन अॅडव्हान्टेज मिळाले. परंतु तिसरा महत्त्वाचा पॉईंटही आकांक्षानेच घेतला. चौथाही गुण सहज घेतला.  चार-चार अशी बरोबरी झाल्याने मयुरी बॅकफूट गेल्याचे दिसून आले. पाचवा गुणही आकांक्षानेच घेतला. दबावात आलेल्या मयुरीवर तिने पुन्हा एक महत्त्वपूर्ण गुण घेत सामना तिसऱ्या सेटमध्ये (६-४) जिंकला.

एकेरीत सहज कांस्य

मुलींच्या एकेरीत महाराष्ट्राला कांस्यपदक सहजपणे पदक मिळाले. पुण्याच्या वैष्णवी आडकर आणि हरियानाच्या श्रृती अहलावत यांच्यात कांस्य पदकासाठी सामना होता. परंतु या सामन्यात श्रृती गैरहजर राहिली. त्यामुळे वैष्णवी कांस्यपदकाची मानकरी ठरली.

मानसिक पाठबळ

एकेरीत सुवर्णपदक पटकावणारी आकांक्षा ही नवी मुंबईतील एएसए अकादमीत सराव करते. प्रशिक्षक अरूण भोसले यांच्यासोबत महाराष्ट्राचे क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे, ओएसडी व्यंकेश्वर, खो-खोचे प्रशिक्षक उदय पवार यांनी सामन्यास उपस्थित राहून आकांक्षाला प्रोत्साहन दिले. ती पिछाडीवर असतानाही मानसिक बळ देण्याचे काम केले. क्रीडा मंत्री सुनील केदार व आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनीही शुभेच्छा देत उत्साह वाढवला.

सायकलिंगमध्ये रौप्य, टेटेमध्ये मुली फायनलमध्ये

रोड सायकलिंगमध्ये मास स्टार्ट प्रकारात सिद्धेश पाटीलने रौप्यपदक पटकावले. तो पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू आहे. टेबल टेनिसमध्येही मुलींनी महाराष्ट्राचा हरियानात डंका वाजवला आहे. त्यांचा अंतिम सामना सायंकाळी सहा वाजता हरियानासोबत होणार आहे. दिया चितळे व स्वस्तिका घोष (दोघीही मंबई) या हरियानाच्या सुहाना सैनी व चक्रवर्ती यांच्यासोबत लढतील. या सामन्यात आपले रौप्यपदक पक्के झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button