स्टार्टअप आणि उद्योजकता विकासासाठी युनिकॉर्नसह यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन घेणार

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 11: देशात सर्वाधिक युनिकॉर्न महाराष्ट्रात आहेत. त्याचबरोबर स्टार्टअप इकोसिस्टीममध्येही महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात तरुणांमधील नवकल्पनांना चालना देणे त्याचबरोबर उद्योजकता वाढीसाठी स्टार्टअप यात्रा, स्टार्टअप सप्ताह, इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यात यापुढील काळातही स्टार्टअप आणि युनिकॉर्न निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी युनिकॉर्न लीडर तसेच यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन घेण्यात येईल, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी यांनी केले.

येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या TiECon India Unicorn Summit 2022 मध्ये काल उद्घाटनपर भाषणात त्या बोलत होत्या. यावेळी श्रीमती वर्मा यांनी सविस्तर सादरीकरण करून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. टायकॉन परिषदेसाठी यंदा विभागामार्फत प्रथमच भागीदारी करण्यात आली. युनिकॉर्नच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे तसेच उद्योजकांना प्रेरित करणे ही यंदाच्या टायकॉन समीटची थीम होती.

श्रीमती वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीने TiE मुंबईसोबत स्टार्टअप्स आणि इनक्युबेटर्सना मार्गदर्शन करण्यासाठी आणि TiE च्या विशाल नेटवर्कचा फायदा घेऊन गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यासाठी भागीदारी केली आहे. राज्यात स्टार्टअपचा शासकीय कामात उपयोग करून घेण्यासाठी स्टार्टअप सप्ताहसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. नवउद्योजकांना कार्यादेश देऊन शासकीय काम देण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 15 कोटी रुपयांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय स्टार्टअपना पेटंट मिळविण्याच्या प्रक्रियेसाठी १० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. राज्यात घेण्यात आलेले असे विविध निर्णय आणि स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची फलनिष्पत्ती म्हणून स्टार्टअप आणि युनिकॉर्न निर्मितीमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे, असे त्यांनी सांगितले.

युनिकॉर्न आणि स्टार्टअप्समार्फत राबविण्यात आलेल्या बेस्ट प्रॅक्टिसेस, त्याचबरोबर बेस्ट बिझनेस मॉडेल यांना स्वीकारून त्यांचा अवलंब करण्यात आला पाहिजे. राज्यात स्टार्टअप आणि यूनिकॉर्नची निर्मिती ही सध्या महानगरांभोवतीच केंद्रित झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातही स्टार्टअप आणि युनिकॉर्न निर्मिती, त्याचबरोबर उद्योजकतेला मोठा वाव आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही श्रीमती वर्मा यांनी यावेळी सांगितले.

अनेक युनिकॉर्न संस्थापक, उद्योजक विविध उद्योगांचे सीईओ या कॉन्फरन्समध्ये उपस्थित होते. अनुपम मित्तल (shaadi.com), हर्ष जैन (ड्रीम11) नवीन तिवारी (इनमोबी), अमिताव साहा (एक्सप्रेस बीज), आशिष हेमराजानी (बुक माय शो), निशिथ देसाई, सिद्धार्थ शाह (PharmEasy) आदी विविध उद्योजकांनी यावेळी सादरीकरण केले.

कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या शुभेच्छा

दरम्यान, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी या कॉन्फरन्ससाठी शुभेच्छा कळविल्या . TiECon India unicorn summit 2022 च्या माध्यमातून स्टार्टअप आणि युनिकॉर्न निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. या कार्यात महाराष्ट्र शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

विभागाने आयोजित केलेल्या स्टार्टअप सप्ताहाचे विजेते ठरलेल्या स्टार्टअप्सच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचे कॉन्फरन्समध्ये प्रदर्शन करण्यात आले.

 

याप्रसंगी विविध स्टार्टअप, युनिकॉर्नचे प्रतिनिधी, उद्योजक, TiECon चे पदाधिकारी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी मिथुन जॉन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.