कृषि टर्मिनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार

आठवडा विशेष टीम―

नाशिक, दिनांक: 11 जून २०२२ (जिमाका वृत्तसेवा): शहरातील सय्यद पिंप्री येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित कृषि टर्मिनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज शहरातील सय्यद पिंप्री येथील कृषी टर्मिनल प्रकल्पाच्या जागेची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्‍यावेळी त्यांनी सर्व्हे नं १६५४ मधील १०० एकर जागा या प्रकल्पाला लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार सरोज अहिरे, प्रांताधिकारी अरविंद नरसीकर, तहसीलदार अनिल दौंडे, पणन विभागाचे उप महाव्यवस्थापक बहाद्दूर देशमुख, व्यवस्थापक अभियांत्रिकी हेमंत अत्तरदे, सरपंच मधुकर ढिकले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यातील उत्पादित शेतमालाला देशासह परदेशात मोठी मागणी आहे. हे कृषि टर्मिनल उभारल्याने शेतकऱ्याचा थेट बाजाराशी संपर्क प्रस्थापित करून उत्पादनाच्या विक्रीस पर्याय उपलब्ध करून देता येणार आहे. तसेच ओझर विमानतळ व राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने दळणवळणाची सुविधाही उपलब्ध असणार आहे. कृषी टर्मिनल मार्केटमुळे शेतमाल आणि फलोत्पादनाच्या विक्रीच्या प्रचलित पद्धतीमुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे.

तसेच या कृषी टर्मिनल मार्केटमध्ये फळे आणि भाजीपाला, अन्नधान्य, पोल्ट्री, मास, दुग्धजन्य पदार्थांची व उत्पादनाची साठवणुक करता येणार असून या कृषि टर्मिनल मुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. या अनुषगंगाने आज या जागेची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.