प्रशासकीयब्रेकिंग न्युज

विटा नगरवाचनालयाचा स्मृती-सुगंध हा ऐतिहासिक ग्रंथ सर्वांना उपयोगी ठरेल – पालकमंत्री जयंत पाटील

आठवडा विशेष टीम―

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : विटा-खानापूर परिसरातील सर्व इतिहासाचा मागोवा घेवून माहितीचे संकलन करून तयार करण्यात आलेला विटा नगरवाचनालयाचा स्मृती-सुगंध हा ग्रंथ अत्यंत सुरेख व सुबक असा ग्रंथ आहे. हा ऐतिहासिक ग्रंथ सर्वांना उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

विटा येथील जय मल्टीपर्पज हॉल येथे विटा नगरवाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वाचनालयाच्या 150 वर्षाचा आढावा घेणाऱ्या स्मृती-सुगंध ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी सहकार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार सदाशिव पाटील, सरसेनापती संताजी घोरपडे यांचे 12 वे वंशज उदयराजे घोरपडे, ॲड. बाबासाहेब मुळीक, ॲड. संदीप मुळीक, इंद्रजित देशमुख, अविनाश पाटील, जिल्हा परिषद व विटा नगरपालिका आजी व माजी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, खानापूर तालुक्यातील व्यक्तींचे योगदान, ऐतिसासिक वास्तुंचे महत्व व घटनांचा उल्लेख करून आवश्यक माहिती देवून ॲड. बाबासाहेब मुळीक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांच्या वाचनासाठी स्मृती-सुगंध ग्रंथ उपलब्ध केला आहे. इतिहासाला विसरायच नसतं, जो इतिहास विसरतो त्याचे भवितव्य अंधकारमय होवू शकते. सर्वांच्या समोर अत्यंत उत्तम शब्दात ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी स्मृती-सुगंध हा ग्रंथ मांडला आहे. या ग्रंथात महान व्यक्ती, महत्वपूर्ण योगदान दिलेले लोकप्रतिनिधी, आरोग्य, शिक्षण, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींचा, जुन्या वास्तु, शिलालेख व त्यावरील मजकूर यांचा उल्लेख प्रकाशात आणण्याचे काम झाले आहे. हे सर्व काही कागदावर आले असल्याने हा महत्वपूर्ण दस्तऐवज प्रदीर्घ काळ टिकून राहील, असे ते यावेळी म्हणाले.

 विटा नगरवाचनालय 1869 साली सुरू झाले होते. फार वर्षापासून खानापूर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असून आता या भागात पाणी आले आहे. या भागात साखरेचा समृध्दीचा वारसा उभा करावा. प्रतिकूल परिस्थितीत कसे जगायचे असते हे खानापूर तालुका वासियांनी सर्वांना शिकवले आहे. निसर्गाची साथ नसताना जगाच्या पाठीवर जावून कोठेही आपले विश्व निर्माण करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. प्रचंड जिद्द, आत्मसन्मान, कष्ट, योग्य मार्गाने केलेला प्रगतीचा हट्टास या भागातील सर्वात मोठा इतिहासाचा वारसा आहे. स्मृती-सुगंध हा ग्रंथ प्रत्येकाने जतन करणे, तालुक्यातील प्रत्येक वाचनालयात ठेवणे, पुढच्या पिढीला वाचण्यासाठी आग्रह करणे आवश्यक असल्याचे सांगून सांगली जिल्ह्याचेही अशा प्रकारचे पुस्तक तयार करण्यात यावे, असे ते यावेळी म्हणाले.

मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, ब्रिटीशांच्या हुकूमशाहीखाली हा देश असताना 1869 मध्ये विटा सारख्‍या छोट्या शहरात वाचनालय उभे करण्यात आलेले आहे. वाचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व्हावे, लोकांना ज्ञान मिळावे, ज्ञानाच्या माध्यमातून समाजामध्ये सुधारणा व्हावी या कल्पनेने त्यावेळी वाचनालयाची सुरूवात झाली असावी असे सांगून राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, सध्या मोबाईलमुळे नवीन पिढीत वाचनाची आवड दिवसेंदिवस कमी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन, स्वातंत्र्य लढ्याची चळवळ, वाचनाची आवड या गोष्टींना दिशा देण्याचे काम केले. याचा पाया 1930-40 च्या काळात रचला गेला. यामधून स्वातंत्र्यानंतर देशाची पुढची घडी कसी असावी याचा बोध मिळाला. विटा नगरवाचनालयाच्या उपक्रमासाठी मराठी भाषा खात्याच्या माध्यमातून 5 लाख रूपयांचा निधी देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. वाचनालयासाठी आणखी काही पुस्तके घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. जादा निधीची गरज भासल्यास तो कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. नगरवाचनालयाची परंपरा चांगल्या भावनेतून जोपासाठी व सुधारावी. यातून पुढच्या पिढीला चांगली दिशा मिळेल. अशा प्रकारच्या सांगली जिल्ह्याच्या पुस्तिकेसाठीही जो काही निधी लागेल तो मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते खानापूर तालुक्याच्या 150 वर्षाच्या ऐतिहासिक वाटचालीत योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर व त्यांचा वारसांचा सत्कार करण्यात आला.

स्वागत व प्रास्ताविक ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी केले. यावेळी त्यांनी विटा नगरवाचनालय 14 जून 1869 रोजी स्थापन झाले असल्याचे सांगून 150 वर्षाच्या वाटचालीत ज्यांनी योगदान दिले त्यांच्या कारकिर्दीचा आढावा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, शेती, गलाई, कुकुटपालन, उद्योग, सहकार या क्षेत्रात ज्यांनी योगदान दिले त्यांची नोंद स्मृती-सुगंध या ग्रंथात घेण्यात आली असल्याचे सांगितले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button