महाराष्ट्र सदनातील सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिकांची मनं जिंकली

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, दि. 12 : दलखाई, सिंगारीनाचा आणि बजासाल या ओडिशातील लोकनृत्यांचे बहारदार सादरीकरण, जोडीला महाराष्ट्राच्या लोककलांचे लेणे असणाऱ्या लावणी, भारुड, वासुदेव आदि लोककलांच्या तितक्याच आकर्षक सादरीकरणाने आज उभय राज्यांच्या सांस्कृतिक वैभवाचे दिमाखदार दर्शन दिल्लीकरांना घडले.

प्रसंग होता, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, दिल्लीस्थित महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी दीपप्रज्वलन करून केले. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव पियूष सिंह,महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त (अ.का.) डॉ निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यावेळी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांमध्ये सांस्कृतिक आदान- प्रदानासाठी करार झाला आहे. या पार्श्वभूमीवर उभय राज्यांतील सांस्कृ‍तिक बंध अधिक घट्ट होण्याच्या उद्देशाने आयोजित आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील एकापेक्षा एक सरस सादरीकरणाने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.

ओडिशा सरकाराच्या संगीत नाटक अकादमीच्यावतीने ‘प्रतिवा समूहाच्या’ 10 आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने महाराष्ट्राकडून सांगली येथील ‘शाहीर शुभम विभूते आणि पार्टी’ यांच्या 15 कलाकारांनी या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमात उत्तमोत्तम सादरीकरण केले. या कलाकारांनी ‘सिंगारीनाचा’ या लोकनृत्याच्या माध्यमातून ओडिशातील समृध्द आदिवासी परंपरेचे दर्शन घडविले. ‘बजासाल’ या लोकनृत्याच्या सादरीकरणातून ओडिशातील लग्नविधी प्रसंगी स्थानिकांकडून धरण्यात येणारा नृत्यावरील फेर उपस्थितांनी अनुभवला व टाळ‌्यांच्या कडकडाटात या सादरीकरणास त्यांची दाद मिळाली. राज्यातील बहुतांश भागात सण-समारंभावेळी सादर होणारे ‘दलखाई नृत्य’ व या नृत्याला वेगळ्या उंचीवर घेवू जाणारी पारंपरिक वाद्येही आकर्षणाचे केंद्र ठरले. ओडिशाच्या महिला कलाकारांनी परिधान केलेली खास पारंपरिक अवचपुरी साडी आणि कतरीया, बंदरीया, वगला ही आभुषनेही आकर्षण ठरली.

शाहीर शुभम विभूते यांच्या चमुने गणेशवंदनेद्वारे महाराष्ट्राच्या लोककला सादरीकरणास सुरुवात केली. पारंपरिक वेशभुषेतील या सादरीकरणानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भल्यापहाटे गाव जागवीत येणारी वासुदेवाची स्वारी ही वासुदेव नृत्यातून उत्तमरित्या मांडली. आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणाऱ्या भारुडाचे सादरीकरणही उपस्थितांची दाद मिळवून गेले. महाराष्ट्राच्या लोककलेतील मोलाचा दागीना असणाऱ्या लावणी नृत्याच्या बहारदार सादरीकरणाने सभागृहात एकच उत्साह संचरला. गौळण, पोवाडा, गोंधळ, वाघ्या-मुरळी आदी लोककलांच्या सादरीकरणानेही उपस्थितांची मने जिकंली.

0000

रितेश भुयार /वि.वृ.क्र.87/दि.12.06.2022

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.