आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत दुसऱ्यांदा यश मिळविलेल्या वैभव काजळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. १४ जून व बुधवार १५ जून २०२२ रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ मुलाखतकार शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
केंद्रीय नागरी प्रशासकीय सेवेत महाराष्ट्राचा टक्का वाढता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासन समाजातील सर्व घटकांसाठी विविध उपाय योजना राबवित असून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या परीक्षेत त्यांनी यश मिळवावे, यासाठी प्रयत्न करत आहे. शासन राबवित असलेल्या जनजागृतीमुळे अनेक विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे वळत आहेत आणि त्याचे सकारात्मक परीणामही दिसून येत आहेत. कठोर मेहनत आणि योग्य मार्गदर्शन या बळावर वैभव काजळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकदा नव्हे तर दोनदा यश मिळविले. त्यांच्या या यशाबद्दल सविस्तर माहिती त्यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.