महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकाबरोबरच देशातील क्रीडा रसिकांची मने जिंकली

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 13: सलग तीन वर्षे ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत अव्वल स्थान पटकविणाऱ्या महाराष्ट्राच्या टीममधील प्रत्येक खेळाडूंनी यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत जिगरबाज खेळ करत पदकांबरोबरच देशातील क्रीडा रसिकांची मने जिंकली आहेत. यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत अव्वल स्थान राखण्यासाठी महाराष्ट्राच्या टीमने शर्थीचे प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 45 सुवर्णपदकांसह 125 पदकांची कमाई करत क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची मान उंचावली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, पंचकुला (हरियाणा) येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेच्या शेवटच्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची टीम अव्वल स्थानी होती. मात्र शेवटच्या दिवशी हरियाणाच्या टीमने काही अधिकची पदके जिंकत पहिल्या स्थानी झेप घेतली. पहिल्या स्थानी राहण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक खेळाडूने शर्थीचे प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या टीमने अंतिम पदक तालिकेत  45  सुवर्ण 40 रौप्य आणि 40 कांस्य पदकांसह एकूण 125 पदकांची कमाई करत क्रीडा रसिकांची मने सुध्दा जिंकली. राज्यातील प्रत्येकाला आपल्या खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान आहे. या यशासाठी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि व्यवस्थापकांसह त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या पालकांचे सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.