प्रशासकीय

बालकांच्या शाळेतील स्वागतासाठी शिक्षण विभाग सज्ज

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 14 – आज 15 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होत असून अनेक बालकांचे ‘पहिले पाऊल’ औपचारिक शिक्षण प्रवाहात पडणार आहे. हे पाऊल जितके दमदार, आनंदी, उत्साही आणि कृतीयुक्त पडेल तितकी शालेय शिक्षणाची अभिरूची वृद्धींगत होणार आहे. या अनुषंगाने कोरोनाच्या नकारात्मक कालावधीला मागे सारून शालेय शिक्षण विभागाने बालकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. चला आपण सर्व मिळून या बालकांचा प्रवेशोत्सव साजरा करू या, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

कोरोनाच्या विपरित परिणामांना शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. तथापि, राज्याच्या शिक्षण विभागाने मुलांचे शिक्षण सुरू ठेवले. बालक शिक्षणापासून दूर जाऊ नयेत याकरीता सेतू अभ्यासक्रम, ऑनलाइन अध्ययन, शिकू आनंदे, टिलीमीली, गोष्टींचा शनिवार, स्वाध्याय, दैनिक अभ्यासमाला, समाज माध्यमातून शिक्षण, जिओ चॅनलच्याद्वारे कोविड 19 च्या परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवले. आता शाळा सुरू झाल्या आहेत. या परिस्थितीत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील बालकांच्या विकासात महत्वाची भूमिका बजविणाऱ्या ‘पहिले पाऊल’ या शाळापूर्व तयारी अभियानाचे राज्यात सर्वत्र आयोजन करण्यात आले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर दुसरा मेळावा आयोजित केला जाणार असून त्यात पहिल्या मेळाव्यानंतरच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे.

राज्यातील पहिले ते आठवी पर्यंतच्या अनुदानित शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली आहेत. याअंतर्गत 82 हजारांहून अधिक शाळांमधून पाच कोटी 38 लाखांहून अधिक पुस्तके वितरीत करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन गणवेश खरेदी करण्यात आले आहेत. याचबरोबर नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नजीकच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगारवस्त्या अशा ठिकाणी सर्वेक्षण करून शाळेच्या परिसरातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य हे शैक्षणिकदृष्ट्या भारतातील प्रगत राज्य गणले जाते. राज्यात विद्यार्थ्यांना उपयुक्त विविध उपक्रम राबविले जातात. पहिले पाऊल अभियानाच्या निमित्ताने सहज सुलभ साहित्य विकसित करण्यात आले होते. यातील आयडिया कार्ड, त्यातील माता पालकांसाठी बनवलेल्या कृती या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यात बालकांच्या भावविश्वाचा, त्यांच्या अभिरूची आणि त्यांच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या कृतींचा विचार केलेला आहे. आई ही बालकाची पहिली शिक्षिका असते. त्यामुळे मुलाच्या शाळापूर्व तयारीसाठी माता समूहांच्या व आयडिया कार्डच्या माध्यमातून हे अभियान बालकांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सहाय्यभूत ठरणारे आहे. या दरम्यान शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने माता गटांना मार्गदर्शन करण्याचे कार्य केले गेले. या आधारे बालकांची पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यापूर्वी ८ ते १२ आठवडे शाळापूर्व तयारी झाली आहे. या अभियानाच्या निमित्ताने शिकण्यासाठीचे त्यांचे पहिले पाऊल अत्यंत दमदार पडेल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button