प्रशासकीय

लेखा व आस्थापना प्रशासकीय कामातील हृदयस्थान असल्याने त्यांचे काम अत्यंत महत्त्वाचे : मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल

आठवडा विशेष टीम―

लातूर,दि.14(जिमाका):- प्रशासकीय कामकाजामध्ये लेखा व आस्थापना शाखेचे कामकाज अत्यंत महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरिरातील अवयवामध्ये ह्दयाचे महत्व आहे. त्याप्रमाणेच लेखा व आस्थापना हे विषय प्रशासकीय कामातील हृदयस्थानच आहे. त्यामुळे या शाखेतील काम करणाऱ्यांचे प्रशासनात खूप महत्वाचे स्थान असते, त्यांच्या कामावरच शासनाची प्रतिमा तयार होते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी आज येथे केले.

लातूर विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने लेखा व आस्थापना विषयक कार्यशाळेचे येथील जिल्हा परिषदेच्या डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर स्थायी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते कुंडीतील झाडाला बांधलेल्या फितीची गाठ सोडून व त्या झाडास पाणी देत अभिनव उपक्रमाने झाले. त्यावेळी श्री.गोयल बोलत होते.

 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) यशवंत भंडारे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन विभाग) नितीन दाताळ हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर लातूर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, नांदेड जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे उपस्थित होते. त्याचबरोबर सहाय्यक संचालक किरण वाघ, माहिती सहाय्यक रेखा  पालवे-गायकवाड, लेखापाल अशोक  माळगे तसेच लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली या चारही जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.

आस्थापना व लेखा विभाग हाताळणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी प्रशासकीय कामे पारदर्शकपणे, अचूक पध्दतीने पार पाडण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करावा. यासाठी या विषयात स्वत: स्वंयपूर्ण व्हावे, म्हणजे कामात अचूकता येण्यास मदत होते, असेही श्री. गोयल यावेळी म्हणाले.

उद्घाटनाचा अभिनव उपक्रम जिल्हा परिषदेमध्ये राबविणार

विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे वृक्ष संवर्धनाचे महत्व पटवून देणारा झाडाला पाणी देवून प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचा अभिनव उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम यापुढेही जिल्ह्यात राबविणार असल्याचे डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी सांगितले. लेखा शाखेचे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वंयपूर्ण राहत प्रशिक्षणाच्या माध्यमातून अचूक व जबाबदारीने काम करण्यावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

उपसंचालक (माहिती) यशवंत भंडारे म्हणाले की, शासकीय अधिकारी, कर्मचारी आपआपली जबाबदारी पार पाडतच असतात. परंतु, त्यातील लेखा व आस्थापना शाखेचे कार्यालयीन कामकाज सुरुळीत पाडतांना अनेक अडचणीही येत असतात. लेखा आक्षेपांचा निपटारा करणे आणि लेखा व आस्थापना विषयक काम अधिक बिनचूक करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे 15 जून, 2022 पूर्वी प्रशिक्षण घेण्यात यावे, असे आदेश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव दीपक कपुर यांनी दिले होते. त्यानुसार या  प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात तज्ज्ञांमार्फत अधिकारी, कर्मचाऱ्यांना लेखा व आस्थापनाविषयक बाबींचे मार्गदर्शन व चर्चासत्रामधून अडचणींचे निराकरण करण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात गतिमानतेसोबतच अचूकता व नियमांची अंमलबजावणी करण्यास मदत होणार आहे. तसेच उद्या दि. 15 जून, 2022 रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रलंबित परिच्छेदांच्या आक्षेपांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने शिबीराचे आयोजन केले आहे,  अशीही माहिती श्री. भंडारे यांनी यावेळी दिली.

या प्रशिक्षण कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी शामसुंदर देव यांनी वित्तीय बाबी जसे कार्यालयीन खर्च, नियमितता, कॅशबुक, देयके सादर करणे व आहरण व संवितरण अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या या विषयावर मागर्दर्शन केले. तर दुसऱ्या सत्रामध्ये  लातूर अप्पर कोषागार अधिकारी डी.एम. कुलकर्णी यांनी आस्थापना विषयक बाबींमध्ये सेवापुस्तके व त्या अनुषंगिक विषयावर , सेवानिवृत्त अप्पर कोषागार अधिकारी ॲड. आण्णाराव भुसणे यांनी निवृत्तीवेतन प्रकरणांचे काम, रजा आणि आयकर विषयक बाबी या विषयावर तर लातूर जिल्हा कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लेखापाल जी. एल. गोपवाड यांनी गटविमा योजना, कोषागारातून आक्षेपित देयक पूर्ततेबाबतीत मार्गदर्शन केले. यावेळी सर्व वक्त्यांनी कर्मचाऱ्यांच्या शंकाचे निरसन करित त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.

या प्रशिक्षण कार्यशाळेचे लातूर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर मनिषा कुरुलकर यांनी आभार मानले.

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button