‘महाप्रित`ने इथिओपियाबरोबर नविनीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये एकत्रित काम करावे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 16 : ‘महाप्रितने’ इथिओपिया देशाबरोबर नविनीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये एकत्रित काम करावे, असे निर्देश सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

इथिओपिया देशाच्या जलसिंचन व ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री व राजदूत अस्फॉ डिन्गामो व त्यांच्या भारतातील समन्वयकासमवेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे तसेच `महाप्रित`चे अधिकारी यांच्यासोबत मुंबईत संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री बोलत होते. या बैठकीला महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महाप्रितचे संचालक (संचलन)  विजयकुमार ना. काळम, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव  दिनेश डिंगळे, महाप्रितचे कार्यकारी संचालक (प्रशासन)  प्रशांत गेडाम, कार्यकारी संचालक (पारेषण) रविंद्र चव्हाण,  सतिश चवरे व इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुंडे म्हणाले, महाप्रित करीत असलेल्या प्रकल्पांच्या अनुषंगाने इथिओपिया देशाबरोबर सामंजस्य करार (MOU) करण्याकरिता त्वरित कार्यवाही करावी तसेच  इथिओपियाच्या मंत्रिमहोदयांनी ज्या क्षेत्रामध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाबरोबर प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. त्याबाबत महाप्रितने त्वरित बैठका घेऊन पुढील निर्णय घ्यावा, असेही श्री. मुंडे यावेळी म्हणाले.

इथिओपियाचे राज्यमंत्री  अस्फॉ डिंन्गामो यांनी त्यांच्या देशाची भौगोलिक संरचना, परिस्थिती, ज्या क्षेत्रात त्यांना एकत्रित काम करण्याचा विचार आहे, याबाबत सविस्तर मुद्दे मांडले. इथिओपियातील पाण्याचा प्रश्न व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, प्रकल्प, त्याबाबतची सद्यस्थिती, सौरऊर्जा प्रकल्पामध्ये महाप्रितची लागणारी आवश्यकता आणि हे प्रकल्प महाप्रित व  इथिओपिया यांच्या संयुक्त उपक्रमाने राबविण्याचा विचार असल्याचे सांगितले. ज्या – ज्या क्षेत्रामध्ये त्यांना महाराष्ट्र शासनासोबत व महाप्रित कंपनीसोबत एकत्रित काम करावयाचे आहे त्याबाबत इथियोपियाचे राज्यमंत्री अस्फॉ डिंन्गामो यांनी  सविस्तर चर्चा केली.

श्री. डिन्गामो यांनी कृषी, पाणीपुरवठा, नविनीकरणीय ऊर्जा, कृषी फिडरचे सोलरायझेशन, नवीन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व अन्य काही क्षेत्रांबाबत सामंजस्य करार (MOU)  करणार असल्याचे सांगितले. तसेच महाप्रितच्या विविध प्रकल्पांच्या उपयोगितेबाबत समाधान व्यक्त केले.

महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक  बिपीन श्रीमाळी यांनी महाप्रित कंपनी व त्यांचे विविध विभाग यामध्ये अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प, पर्यावरणसंबंधित प्रकल्प, ऊर्जा बचत व ऊर्जा संवर्धन प्रकल्प, आरएमसी प्लांट, कृषी प्रक्रिया मूल्य साखळी, परवडणारी घरे, महामार्ग रस्ते प्रकल्प, हायड्रोजन प्रकल्प, नवीन आणि उद्योन्मुख ऊर्जा तंत्रज्ञान प्रकल्प, सॉफ्टवेअर तंत्रज्ञान, सीएसआर प्रकल्प  इत्यादींबाबतची माहिती व सौरऊर्जा प्रकल्प तसेच डाटा सेंटर प्रकल्पाबाबतची कामे सध्या सुरु असून प्रगतिपथावर असल्याची  सविस्तर माहिती दिली. तसेच महाप्रित व इथियोपिया यांच्यासमवेत लवकरच सामंजस्य करार (MOU) करण्याचा मनोदय महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी व्यक्त करून महाप्रितची भूमिका सविस्तरपणे सांगितली.

महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी इथियोपियाचे राज्यमंत्री व राजदूत अस्फॉ डिंन्गामो यांनी महाप्रित कार्यालयास भेट दिल्याबाबत आभार मानले.

**

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.