प्रशासकीयब्रेकिंग न्युज

आनंद सोहळ्याची तयारी

आठवडा विशेष टीम―

पंढरीची वारी वारकऱ्यांसाठी भक्तीचा, श्रद्धेचा आणि चैतन्याचा सोहळा असतो. पंढरीची वारी पायीच करण्याचा प्रघात एके काळी होता व आजही अनेक वारकरी तो पाळतात. वाहनांची सोय झाल्यामुळे बरेचसे लोक वाहनानेही जातात. एरव्ही ठिकठिकाणी विखुरलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर एकमेकांना भेटू शकतात. जे जाऊ शकत नाही त्याची भावना संत नामदेवांनी ‘पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ॥१॥’ अशा शब्दात वर्णिली आहे.

असा हा वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यातून आणि राज्याबाहेरून भाविक येतात. विठूनामाचा गजर करीत एकरूप होतात. तहान-भूक विसरून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्यांना वारीचा आनंद लुटता यावा आणि उत्साहाने पंढरीच्या दर्शनासाठी ते मार्गस्थ व्हावे यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे.

पुणे जिल्ह्यात दोन प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत, देहू आणि आळंदी. देहू येथून संत तुकाराम महाराजांची आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान करते. यावर्षी या दोन्ही पालखी सोहळ्याला अनुक्रमे 20 आणि 21 जून रोजी प्रारंभ होणार आहे. तसेच सासवड येथून संत सोपानकाका आणि चांगावटेश्वरचा पालखी सोहळादेखील 25 जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

पालखी सोहळ्याचा मार्ग साधारणत: जिल्ह्यातील हवेली, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर या पाच तालुक्यातून जात असल्याने या भागावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. राज्याच्या इतर भागातील भाविकदेखील जिल्ह्यातून प्रवास करणार असल्याने त्यांनाही कोणतीही अडचण येऊ नये याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे यंदा दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर हा सोहळा होत आहे. वारीत सहभागी होण्यासाठी भाविक उत्सुक असतात, आणि म्हणूनच यावर्षी नेहमीपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊनच सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी पालखी सोहळ्याच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेण्यात येऊन नियोजनाची रुपरेषा तयार करण्यात आली. सोबतच पालखी मुक्काम, पालखीतळ आणि विसाव्याच्या ठिकाणी भेट देऊन आवश्यक सुविधेबाबत माहिती घेण्यात आली आणि त्यानुसार नियोजनाला अंतिम रुप देण्यात आले.

स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यापक स्वरुपाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत वारकऱ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यानुसार चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री महोदयांनी दिले. बैठकीस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हेदेखील उपस्थित होते.

शासनाने पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छतेच्या सोयी पुरविण्यासाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधांसह ज्या भाविकांनी कोरोना लशीची दुसरी मात्रा किंवा वर्धक मात्रा घेतली नसेल त्यांच्यासाठी लसीकरणाची सुविधा करण्यात येणार आहे. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८७ फिरते वैद्यकीय पथक आणि १०८ रुग्णवाहिका वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी सज्ज असतील. पालखी मार्गावरील रुग्णालयातील १० टक्के खाटा पालखी सोहळ्यादरम्यान आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. देहू आणि आळंदी येथे भविकांच्या अँटीजन चाचणीची सुविधा करण्यात आली आहे.

पावसाळा लक्षात घेऊन पालखी तळाची आवश्यक कामे करण्यात आली आहेत. पालखी मार्गावर महिलांसाठी ५ किमी अंतरावर शौचालय सुविधा करण्यात येणार आहे. पाण्याच्या सुविधेसाठी ३७ विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत आणि ७० टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.

गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलिस विभागातर्फे आवश्यक नियोजनदेखील करण्यात आले आहे. आवश्यक तेथे वाहतूक मार्ग वळविण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालखी सोहळ्यात सहभागी वाहनांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तपासणी करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने पुणे विभागातून ६ ते १४ जुलै या कालावधीत ५३० बसेस सोडण्यात येणार आहेत.

वारीचे पावित्र्य जपले जावे यासाठी पालखी मार्ग, पालखी तळ आणि मुक्कामाचा परिसर स्वच्छ रहावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट, दारुची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

भाविकांच्या व्यवस्थेत कोणतीही त्रुटी रहायला नको, किंवा एखादी घटना घडल्यास तात्काळ प्रतिसादासाठी उपविभागीय अधिकारी यांना इन्सिडन्ट कमांडन्ट म्हणून तर तहसिलदार यांना डेप्युटी इन्सिडन्ट कमांडन्ट म्हणून नेमण्यात आले आहे.

संपर्क यंत्रणा निश्चित करण्यासाठी अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्याचे नियेाजन आहे. ऐनवेळी संपर्क यंत्रणा विस्कळीत झाल्यास बिनतारी यंत्रणादेखील सज्ज ठेवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांकडे वॉकीटॉकी देण्यात येणार आहेत.

पालखी सोहळ्यातील व्यवस्थेबाबत माहिती देण्यासाठी प्रशासनातर्फे सर्व संबंधित यंत्रणांचे संपर्क क्रमांक असलेली पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. सोबतच अशा माहितीसह पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे लाईव्ह दर्शनाची सुविधा असलेले ॲपही तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे वारकऱ्यांना सर्व सुविधांची माहितीदेखील मिळू शकणार आहे.

पालखी सोहळ्यात साधाभोळा भाविक भक्तीभावाने येत असतो. त्याच्या श्रद्धेला किंवा उत्साहाला कोणताही धक्का लागू नये याची दक्षता प्रशासन घेत आहे. प्रशासनाचे सुरक्षा, सुविधा, सेवा या त्रिसुत्रीवर विशेष लक्ष आहे. ‘आमुचिये कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठोबाचे ।।‘ असे म्हणत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने जाणाऱ्या वारकऱ्यांना वारीचा आनंद घेता यावा यासाठीच हा प्रयत्न आहे.

-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button