अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी व कर्मचार्‍यांच्या समस्यांची सोडवणूक करावी―अ.भा.मराठा महासंघ

अंबाजोगाई : राज्य परिवहन महामंडळ व्यवस्थापणाने प्रवासी व कर्मचार्‍यांना नियमितपणे सोयी- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व त्यांच्या समस्या सोडवाव्यात व दर्जेदार सेवा मिळावी यासह इतर मागण्यांचा समावेश असणारे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राणा चव्हाण यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई,आगार व्यवस्थापक अंबाजोगाई यांना मंगळवार,दि.३० एप्रिल २०१९ रोजी देण्यात आले.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी व कर्मचारी यांना सध्या अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.अंबाजोगाई आगाराच्या वतीने प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्‍या बहुतांश बस या खिळखिळ्या झालेल्या आहेत.काही बसच्या खिडक्यांना काचा नाहीत,तर काही बसचे पत्रे निघाले आहेत,तर काही बस या बाकडे मोडलेल्या अवस्थेत आहेत.बसमध्ये स्वच्छता हवी, अस्वच्छतेमुळे गाडीमध्ये बसुन प्रवास करण्याऐवजी अनेकदा प्रवासी पैसे देऊन उभे राहून प्रवास करणेच पसंत करतात.पैसे देऊन प्रवाशांना प्रवास तर जीव धोक्यात घालून कर्मचार्‍यांना बस चालवावी लागत आहे. आगारातील बस क्रमांक-134,805, 9805,2202,646, 3783 या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड आहे.सोबतच अंबाजोगाई आगाराच्या बसमध्ये प्रवास करताना नित्याची बाब म्हणजे वाहका जवळील मशिन मध्ये तसेच चालत्या बसमध्ये वारंवार बिघाड होणे ह्या तर नित्याच्याच गोष्टी होत्या,परंतु आता त्यात आणखी एका नवीन समस्येची भर पडली आहे.ती म्हणजे तिकिटासाठी लागणारा पेपरच (रोल) उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.एकिकडे खाजगी प्रवासी वाहतुकीच्या दर्जेदार सुविधेमुळे एसटीचा प्रवासी दुरावत असताना दुसरीकडे माञ बीड विभाग एस.टी.व्यवस्थापनाच्या अजब कारभारामुळे महामंडळाच्या तोट्यात दिवसागणीक वाढ होत आहे.अंबाजोगाई आगार हे नियमित वर्दळीचे ठिकाण आहे. बीड विभागात उत्पन्नात एक नंबर वर राहणारे हे आगार मागे पडते की काय ? अशी भिती आता कर्मचार्‍यांतून व्यक्त होत आहे. नियमितपणे चालणारी बस अचानक रद्द करणे, चौकशी किंवा विचारपूस करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना योग्य माहिती न देणे,बस उपलब्ध नसल्याचे कारण,देऊन फेर्‍या उशिराने पाठवणे त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी, शाळकरी विद्यार्थी व अबालवृद्धांना तासन तास ताटकळत बस स्थानकावरच थांबावे लागत आहे.

या सर्वांचा परिणाम एस.टी. महामंडळाच्या ‘बहुजन सुखाय,बहुजन हिताय' या ब्रिद वाक्यावर होत असून महामंडळाच्या असुविधेबद्दल प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.सदरील निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राणा चव्हाण, आरोग्य सेल चे शेख मुक्तार,तालुका उपाध्यक्ष दिनेश घोडके,अल्पसंख्याक चे मुख्तार युसूफ शेख,अजिम जरगर,सुनिल औचित्ये,सुधाकर टेकाळे,राम भोसले, सोपान बापू कदम आदींसहीत इतरांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.