प्रशासकीय

‘सामाजिक न्याया’चे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज

आठवडा विशेष टीम―

‘26 जून’ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस. राज्यात सर्वत्र ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवसाचे महत्त्व काय आहे ? राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचे कोणते कार्य व सुधारणा केल्या ज्यामुळे आजच्या त्यांच्या जन्मदिनी राज्यात सर्वत्र ‘सामाजिक न्याय दिन’ साजरा करण्यात येतो. हे आपण या लेखात वाचणार आहोत.

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘26 जून’ हा शासन पातळीवर 2006 पासून ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. 2006 पूर्वी शासन ‘26 जुलै’ हा दिवस शासनाच्या लेखी जन्मदिवस होता. त्यामुळे राज्यात सन 2003 पासून ‘26 जुलै’ हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येत होता. सन 2006 मध्ये शासनाने इतिहास अभ्यासकांची समिती स्थापन केली. या इतिहास अभ्यासकांच्या समितीने आपला अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला त्यानुसार 27 मार्च 2006 रोजी शासन निर्णय काढून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जन्मतारिख 26 जून 1874 ही अधिकृत ठरविण्यात आली. तेव्हा मित्रांनो 2006 पासून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘26 जून’ हा ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

महाराष्ट्रातील समाजसुधारणच्या चळवळीचे नांव ज्या तीन महापुरूषांचे नांव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. ते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर. फुले-शाहू-आंबेडकर हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक आहेत. इथल्या मातीच्या कणा-कणात या महापुरूषांच्या कार्याचा सुगंध दरवळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जसे स्वराज्याच्या जाज्वल्य भावनेचे प्रतिक आहेत. तसे फुले-शाहू-आंबेडकर हे समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या भावनेचे प्रतिक आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महात्मा फुले यांना आदर्श मानायचे. महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक सुधारणेचा वारसा खऱ्या अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुढे चालविला. आज संपूर्ण देशातील बहुजन, दलित समाजातील जनता व चळवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दैवत मानते हीच जनता व चळवळ महात्मा फुले व शाहू महाराज यांना गुरूस्थानी मानते. खऱ्या अर्थाने या चळवळीत महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील सामाजिक न्यायाचा पुरस्कर्ता, सुवर्णमध्य साधणारा दुवा म्हणून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मनदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अशा कोणत्या सामाजिक न्यायाच्या सुधारणा व कार्य शाहू महाराजांनी केल्या आहेत. ज्यामुळे आज त्यांचा जन्मदिवस राज्यात सर्वत्र सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. ते आपण पाहू या ! गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या उपस्थितीत 2 एप्रिल 1894 रोजी खास दरबार भरवून त्यामध्ये शाहू महाराजांचे राज्यारोहण झाले. त्यानंतर महाराजांनी आपल्या पहिल्याच जाहीरनाम्यात, ‘आपणाला मिळालेला राज्य अधिकार हा राजवैभव व राजविलास यांचा उपभोग घेण्यासाठी नसून, तो आपल्या रंजल्या-गांजल्या प्रजाजनांच्या विशेषतः गरीब व अज्ञानी जनतेच्या उद्धारासाठी असल्याचे स्पष्ट केले.

1899 साली कोल्हापूरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला. कोल्हापुरातील ब्राह्मण वर्गाने शाहू महाराजांचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शुद्र लेखले. राजालाच जर अशी वागणूक मिळत असेल तर प्रजेच काय ? असा विचार शाहू महाराजांनी त्यावेळी केला. वैयक्तीक अपमानाकडे सुद्धा व्यापक दृष्टिकोनातून बघणारा हा राजा होता. याचा परिणाम म्हणजे महाराजांनी कुलकर्णी – महार वतने रद्द केली. त्यानंतर महाराज खऱ्या अर्थाने सत्यशोधक समाजाच्या विचारांकडे वळले.

26 जुलै 1902 मध्ये संस्थानांतील नोकऱ्यांमध्ये मागास जाती-जमातींसाठी 50 टक्के आरक्षण ठेवले, ब्राम्हण, प्रभू, शेणवी, पारशी या जाती वगळता इतर सर्व जातींना आरक्षणाचा लाभ दिला. 1908 मध्ये विद्याप्रसारक मंडळी ही संस्था स्थापन केली. भास्करराव जाधव, महादेव डोंगरे, बागल, शिंदे या जवळच्या लोकांना बरोबर घेऊन या संस्थेच्या माध्यमातून दलित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आली. 1906 चा आदेश सांगतो की, कोल्हापूरात चर्मकार, ढोर, महार, मांग या समाजासाठी स्वतंत्र अशा 5 रात्र शाळा सुरू केल्या होत्या. या सर्व शाळा राज्यारोहणच्या प्रसंगी स्थापन झाले असल्याचा इतिहासात दाखला आहे.

14 फेब्रुवारी 1908 रोजी मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात आस्था निर्माण करण्यासाठी मिस क्लार्क वसतिगृह सुरू केली. 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन झाली. दलित समाजाला सर्व प्रकारचे शिक्षण 24 नोव्हेंबर 1911 च्या आदेशान्वये मोफत केले. टोकाचा जातीभेद असणाऱ्या काळात 1918 साली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी राज्यात लागू केला. शाहू महाराज हे कृतिशील समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या चुलत बहिणी चा विवाह इंदूरच्या यशवंतराव होळकर या धनगर समाजातील मुलाशी लावून दिला. मराठा राजघराण्यातील मुलीचा विवाह त्यांनी धनगर समाजातील मुलाशी लावून देऊन आंतरजातीय विवाह घडवून आला. आंतरजातीय विवाहासाठी स्वतःच्या घरून होणारा विरोध त्यांनी धुडकावून लावला. पुढे कोल्हापूर आणि इंदोर संस्थानात मराठा – धनगर आंतरजातीय विवाहाची योजना आखून 25 आंतरजातीय विवाह शाहू महाराजांनी त्या काळी लावून दिले.

शाहू महाराज – आंबेडकर भेटव स्नेहबंध –शाहू महाराजांनी सुरू केलेल्या ‘मिस क्लार्क’ वसतिगृहातील एक विद्यार्थी दत्तोबा संतराम पोवार हे कोल्हापूर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे चेअरमन होते. दत्तोबा पोवार हे शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक होते. त्यांनी 1917 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी परिचय करून घेतला होता. याच दत्तोबांनी डॉ. आंबेडकरांविषयी महाराजांना सांगितले. दलित समाजातील एक तरुण मुलगा शिक्षण घेऊन तयार झाल्याचे ऐकून महाराजांना आनंद झाला. त्या दोघांची भेट 1919 मध्ये झाली. दोघांचे स्नेहबंध दृढ झाले. दलितांची बाजू जनतेसमोर आणि भारत दौऱ्यावर आलेल्या साऊथबरो समितीसमोर मांडण्यासाठी डॉ. आंबेडकरांना वर्तमानपत्राची गरज भासू लागली. ही बाब बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी महाराजांच्या कानावर घातली आणि वर्तमानपत्र सुरू करण्याची योजना त्यांच्यासमोर ठेवली. महाराजांना ही योजना पसंत पडली आणि त्यांनी वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी तात्काळ अडीच हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यातूनच 31 जानेवारी 1920 रोजी ‘मूकनायक’ पाक्षिक सुरू झाले.

वकिलीच्या क्षेत्रात उच्चवर्णियांची हुकूमशाही मोडून काढली-वकिलीच्या क्षेत्रातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शाहू महाराजांनी 11 मार्च 1920 रोजी एका हुकूमान्वये करवीर इलाख्यातील सर्व कोर्टात वकिली करण्यासाठी रामचंद्र शिवराम कांबळे, रामचंद्र सखाराम कांबळे, दत्तात्रेय संतराम पोवार, तुकाराम अप्पाजी गणेशाचार्य, कृष्णराव भाऊसाहेब शिंदे, विश्वनाथ नारायण कुंभार, धोंडदेव रामचंद्र व्हटकर आणि कलेश यशवंत ढाले आदींना सनदा दिल्या.

माणगांव परिषद –दत्तोबा पोवार, गंगाराम कांबळे, तुकाराम गणेशाचार्य, शिवराम कांबळे, रामचंद्र कांबळे, निंगाप्पा ऐदाळे यांनी चर्चा करून माणगाव परिषद घेण्याची तयारी चालवली. त्यासाठी निंगाप्पा ऐदाळे डॉ. आंबेडकरांना भेटले. या भेटीत २१ व २२ मार्च १९२० ही तारीख निश्चित करण्यात आली. त्या परिषदेत शाहू महाराज म्हणाले, “तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात, याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. माझी खात्री आहे, की आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत; इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते हिंदुस्थानचे पुढारी होतील.”

बाबासाहेबांनी अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद ३० व ३१ मे १९२० रोजी नागपुरात भरवली. या परिषदेचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी स्वीकारले होते. राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी दृष्टिकोन, त्यांचे द्रष्टेपण त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीतून दिसून येते. सामाजिक क्रांतीचे त्यांचे विचार एखाद्या दिपस्तंभाप्रमाणे आजही मार्गदर्शक ठरतील असेच आहेत.

– सुरेश पाटील,

माहिती अधिकारी, उप माहिती कार्यालय, शिर्डी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button