प्रशासकीय

शाहू महाराज : बहुजनांच्या सार्वत्रिक विकासासाठी प्रयत्नरत रयतेचा राजा

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि.26: राजर्षी शाहू महाराजांनी  दलित, शोषित, मागासवर्गीयांच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले, त्यांनी या वर्गासाठी कोल्हापूर संस्थानात पहिल्यांदा 50 टक्के आरक्षण लागू केले. शिक्षणासाठी सर्वांसाठी दारे उघडी केली, त्यासोबतच त्यांच्यासाठी वसतिगृह उघडून शिक्षणास चालना दिली. विरोधाला न जुमानता मागासवर्गीयांच्या सार्वत्रिक विकासासाठी कार्य केले, असे प्रतिपादन  ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

सामाजिक न्याय दिनाचा कार्यक्रम दीक्षाभूमी जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम हॉल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, आमदार अभिजीत वंजारी,  विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, समाजकल्याण सभापती नेमावली माटे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

रयतेचा राजा, सामाजिक न्यायाचे प्रणेते, बहुजनाचे महानायक राजर्षी शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून दरवर्षी साजरी करण्यात येते. शाहू महाराज मराठी संस्कृतीचे जनक आहेत. ब्रिटिशांच्या साम्राज्यात त्यांनी दलित, मागासवर्गीयांना न्याय मिळवून दिला.  कोल्हापूर संस्थानात राधानगरी धरण उभारुन संस्थान सुजलाम सुफलाम केले, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

दलित व मागासवर्गीयांना शिक्षणाची दारे उघडून त्यांना मुख्य प्रवाहात आणले. मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांच्या कार्याबद्दल गुजरात येथील कुरमी समाजाने त्यांनी राजर्षी पदवी बहाल केली. फुले, शाहू, आंबेडकर या त्रयींचा वारसा महाराष्ट्राला लाभला असून त्यामुळे राज्य प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

शाहू महाराजांनी धर्म व जातीभेद कधीच केला नाही. पहिल्यांदा आरक्षणास सुरुवात केली. डॉ. आंबेडकरांच्या उच्च शिक्षणासाठी मदत केली. सामाजिक न्याय विभागाने अनेक योजना आणल्या आहेत. त्यातील परदेशात उच्चशिक्षणासाठी  दिली जाणारी शिष्यवृत्ती योजना असून त्याची मयार्दा 500 ची करण्याची विनंती सामाजिक न्याय मंत्र्यांना करणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

आश्रमशाळांना अनुदान प्राप्त झाले नाही, त्यांना लवकरच अनुदान मिळवून देणार आहे. दलित व मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च वर्गीयांच्या बरोबरीने आपला विकास करावा,असेही ते म्हणाले. पुढील काळ उच्च शिक्षित व शिक्षित असे दोन गट राहणार आहेत त्यासाठी  शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. त्यासाठी सामाजिक न्याय विभाग  आपल्या पाठिशी आहे,असेही त्यांनी सांगितले.

यावेळी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही संबोधित केले. लोकशाहीमध्ये शाहू फुले,आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणे सर्वांचे कर्तव्य आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत त्यांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहाेचले पाहिजेत. शाहू महाराजांचे विचार आत्मसात करा.त्यानुसार मार्गक्रमण करा, असे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले.

प्रशासनाने महिलांना विविध योजनांचा लाभ महिलांना द्यावा. त्यांच्या हाताला काम देवून रोजगारक्षम बनवावे, असेही त्यांनी मागदर्शन करतांना सांगितले.

सामाजिक न्यायाच्या योजनांची व्याप्ती वाढविणे गरजेचे असून योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळेल यावर विभागाने लक्ष केंद्रीत करावे, असे आमदार अभिजीत वंजारी यांनी सांगितले. विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे समाजकल्याण विभागाने योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. अधिकारी व कर्मचारी यांनी चोखपणे आपले काम बजवावे. हीच शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरेल, असे सांगितले. समाजकल्याण विभागामुळे मी घडले आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी आर.  विमला यांनी शाहू महाराजांनी सामान्य व्यक्तीच्या अस्तित्वाची जाणीव  करुन दिली. सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी योजना लागू केल्या. सिंहाची चाल व गरुडाची नजर शाहू महाराजांची होती. राजर्षि शाहू महाराजाच्या कार्याची महती सांगितली. त्याची शिकवण अनुसरावी. त्याप्रमाणे प्रगती करावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी कमलकिशोर फुटाणे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी  दहावी व बारावीच्या परीक्षेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दिव्यांग पालकांची प्राविण्यप्राप्त मुलगी साक्षी वर्मा तेलंग व आदर्श गृहपाल सुधीर मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला तसेच तृतीयपंथीयांचे प्रतिनिधी राणी ढवळे व चमूंना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले.

प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी  सामाजिक न्याय योजनेची माहिती दिली. 2 हजार लोकांना रोजगारभिमुख करण्यात आले असून शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. समानसंधी निर्मिती केंद्राची सुरुवात करण्यात आली. बार्टीमार्फत युवकाचा गट निर्माण करुन प्रशिक्षण देण्यात आले. त्यासोबत एमआयडीसीमध्येही कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button