बौद्धिक क्षमता वृध्दींगत करण्यासाठी बुध्दिबळ खेळ महत्वपूर्ण

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि. 2 : बुद्धिबळ या खेळाचे उगमस्थान भारत देश असून तो फार पूर्वीपासून देशभरात सर्वत्र खेळला जातो. या खेळात मनुष्याच्या मेंदूचा मोठा वापर होतो. बौध्दीक क्षमतांना वृध्दींगत करण्यासाठी तसेच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यांवर रणनिती आखण्यासाठी बुद्धिबळ सहाय्यभूत ठरत असल्याने विद्यार्थ्यांना बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त चेन्नई येथे 44 व्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन होत असून देशातील 75 ठिकाणी बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालीचे स्वागत होत आहे. त्यात नागपूर शहराचा समावेश असून त्याअंतर्गत ऑलिम्पियाड मशालीचे आज शहरातील झिरो माईलवर बुद्धिबळपटूंच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत करण्यात आले. या मशाल रॅलीचे शहरातील झिरो माईल स्टोनपासून मार्गक्रमणाला सुरुवात होऊन जि. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सांगता झाली. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात खेळाडूंना श्रीमती खोडे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी आर. विमला, साईच्या प्रादेशिक संचालक सुष्मिता ज्योतीषी, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ असोशिएशनचे उपाध्यक्ष गिरीष व्यास, निशांत गांधी, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पुनम धात्रक, आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. जयप्रकाश  दुबळे, भुषण  श्रीवास, रायसोनी ग्रूपचे संचालक विवेक कपूर, बुध्दिबळपटू रौनक साधवानी, दिव्या देशमुख, संकल्प गुप्ता यांच्यासह बुद्धिबळ संघटना, नेहरु युवा केंद्राचे पदधिकारी यावेळी उपस्थित होते.

मनुष्याच्या सर्वांगिण विकासासाठी व्यायाम व खेळ फार आवश्यक आहे. खेळ खेळल्याने तसेच व्यायाम केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत व्यायामाचे नियोजन करावे. बुद्धिबळ या खेळात रणनिती आखण्यासाठी बौध्दीक क्षमतेची कसोटी लागते. प्रतिस्पर्ध्याला हरविण्यासाठी त्याने केलेल्या चालीवर अचूक चाल चालून विजय मिळवावा लागतो. बुद्धिबळ हा बैठे खेळ असल्याने त्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या पाल्यांची बौध्दीक क्षमता वाढविण्यासाठी बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करावे. विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी बुद्धिबळ खेळ सहाय्यभूत ठरतो, असे श्रीमती खोडे यांनी सांगितले.

श्रीमती विमला म्हणाल्या की, शालेय व महाविद्यालयीन जीवनात प्रत्येकाकडे काहीतरी नवीन करण्याची उर्मी व उर्जा असते. त्या उर्मीला खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कायम कार्यान्वित ठेवावे. व्यायाम तसेच खेळाने शारीरिक व बौध्दिक विकास होतो. नियमित व्यायाम व खेळ खेळल्याने मन व शरीर सदृढ राहिल्याने सकारात्मक उर्जा निर्माण होते. या सकारात्मक उर्जेच्या सहाय्याने आपण ताणतणावाला दूर सारु शकतो. विद्यार्थी दशेत असताना लहान मुला-मुलींना कुठल्याही खेळ खेळण्यासाठी आवड निर्माण करावी. यामुळे त्यांच्यात खेळाडूवृत्तीचा उदय होतो. विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये टिम वर्क व एकीकरणाचे महत्व कळते. त्याचा संपूर्ण आयुष्यात त्याला खूप फायदा होतो.

यंदा 44 व्या ऑलिम्पियाड बुध्दिबळ स्पर्धेचे यजमान पद भारताला मिळाले असून 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान चेन्नई येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालीचे 17 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद यांना हस्तांतरित करुन तीच्या मार्गक्रमणास शुभारंभ झाला आहे. देशातील 75 महत्वाच्या शहरात मशालीचे स्वागत करण्यात येत आहे. 30 वर्षांनंतर आशियात आणि भारतात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून 189 देशांचे खेळाडू यंदा या स्पर्धेत सहभागी होत आहेत, अशी माहिती श्री. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा अधिकारी प्रा. श्रीमती बिसेन आणि माया दुबळे यांनी तर जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी आभार मानले. बुध्दिबळ ऑलिम्पियाड मशाल रॅलीचे संविधान चौक-आकाशवाणी चौक-महाराज बाग- लॉ कॉलेज चौक- रविनगर चौक-वाडी टी पॉईंट – रायसोनी कॉलेज असे मार्गक्रमण झाले. या कार्यक्रमाला बुध्दिबळ संघटनेचे पदाधिकारी, क्रीडा पुरस्कारार्थी व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, खेळाडू विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

1 thought on “बौद्धिक क्षमता वृध्दींगत करण्यासाठी बुध्दिबळ खेळ महत्वपूर्ण”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.