आठवडा विशेष टीम―
ठाणे, दि. 4 (आठवडा विशेष) – मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज रात्री ठाण्यातील आनंद आश्रम येथे सहकारी आमदारांसह भेट दिली. यावेळी त्यांनी व उपस्थित आमदारांनी धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. स्व. दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे भावूक झाले होते.
रात्री दहाच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांचे बसमधून इतर आमदारांसह टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरुष भर पावसात उभे होते. ढोलताशाच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. आनंद आश्रमात पाऊल ठेवताच उपस्थित महिलांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी माजी कृषिमंत्री आमदार दादाजी भुसे, आमदार संजय राठोड, आमदार यामिनी जाधव यांच्यासह इतर सहकारी आमदार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.
आनंद आश्रमातील भेटीनंतर बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी मुख्यमंत्री महोदयांनी भर पावसात भेट घेतली. तसेच येथे उभारलेल्या स्टेजवरून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनीही मुख्यमंत्री महोदयांचे जल्लोषात स्वागत केले.
०००००