Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
नवी दिल्ली, दि. 6 : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगद्याचे बांधकाम प्रगतीपथावर असून पुढील वर्षी मार्च महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
खंबाटकी घाटाच्या कामाच्या प्रगतीविषयी माहिती देणारा ट्विट संदेश आज श्री.गडकरी यांनी केला आहे. यानुसार पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वर सध्या प्रत्येकी 3 मार्गिका असलेल्या दुहेरी बोगद्याचे कार्य सुरु असून इंग्रजी वर्णाक्षर ‘एस’ प्रमाणे असलेल्या वळणमार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल. यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मोठी घट होईल.
पुणे-सातारा आणि सातारा-पुणे कडील प्रवासासाठी या बोगद्यातून जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत १० ते १५ मिनिटांनी घट होऊन केवळ ५ ते १० मिनिटात या बोगद्यातून प्रवास करता येईल. 6.43 किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी अंदाजे 926 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे श्री.गडकरी यांनी सांगितले आहे.
००००