आठवडा विशेष टीम―
धुळे, दि. 6 (आठवडा विशेष वृत्तसेवा) : वातावरणीय बदलांमुळे नैसर्गिक आपत्त्तींच्या स्वरूपात बदल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशा परिस्थितीत सर्व शासकीय यंत्रणांनी पूर्व तयारी करून सतर्क राहावे, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालक सचिव तथा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी पालक सचिव श्री. रस्तोगी यांनी विविध योजनांचा आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे (शिरपूर) यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालक सचिव श्री. रस्तोगी म्हणाले, वातावरणीय बदलांमुळे अनपेक्षित नैसर्गिक आपत्ती येवू शकतात. संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाने पूर्व तयारी करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक साधनसामग्रीची उपलब्धता करून ठेवावी. या साधनसामग्रीसह रंगीत तालिम घ्यावी. गाव आणि तालुका पातळीवरील यंत्रणेला आपत्तीत करावयाच्या उपाययोजना याविषयी सखोल मार्गदर्शन करावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार प्रशिक्षण वर्ग आयोजित करावा. संभाव्य आपत्तीच्या काळात शासकीय यंत्रणेबरोबरच साधनसामग्री, मनुष्यबळाच्या नियोजनासाठी स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, औद्योगिक संस्थांची मदत घ्यावी. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयीची माहिती देण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी.
पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने दक्षता बाळगत उपाययोजना कराव्यात. नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिक बाधित झाले, तर त्यांच्या पुनर्वसनासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात. त्यासाठी जागा, मूलभूत सोयीसुविधांची निश्चिती करून ठेवावी. संभाव्य आपत्तीच्या काळात बचाव कार्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता पथके गठित करावीत. या पथकातील सदस्यांना प्रशिक्षण द्यावे. इमारती पडक्या असतील, तर संबंधितांच्या स्थलांतरासाठी उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक बि- बियाणे, रासायनिक खतांची उपलब्धता करून ठेवावी. शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ऑक्सिजन प्रकल्प तातडीने कार्यान्वित होतील, असे नियोजन करावे. कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबवीत प्रत्येक पात्र नागरिकाला पहिला, दुसरा आणि बूस्टर डोस मिळेल, असे नियोजन करावे, असेही निर्देश पालक सचिव श्री. रस्तोगी यांनी दिले. यावेळी त्यांनी जिल्हा वार्षिक योजना, मानव विकास मिशन, पीक कर्ज योजना, पीक विमा योजना, नवसंजीवनी योजनेचा सविस्तर आढावा घेतला. तसेच पालक सचिव श्री. रस्तोगी यांनी धुळे जिल्ह्याने केलेल्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणेने संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी पूर्व तयारी केली आहे. उपलब्ध साधनसामग्रीची रंगीत तालिम घेण्यात आली आहे. जिल्हास्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 80 टक्के क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला आहे. खरीप हंगामासाठी ऑगस्टपर्यंत पीक कर्ज वितरणाच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. कोविड 19 प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यात येत असून लसीकरणावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याची माहिती दिली. तसेच सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.